दिंद्रुड ( लोकाशा न्युज )
दुचाकी ला पाठीमागून धडक देत झालेल्या भीषण अपघातात एक ठार एक गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. जवळपास एक किलोमीटर दुचाकीला जखमी सह आयशर फरफटत नेत होती.
सविस्तर वृत्त असे की, दिंद्रुड येथील अशोक पांडुरंग ठोंबरे (वय 32 वर्ष) यांचे दिंद्रुड पासून जवळच असलेल्या बेलोरा पॉईंटवर खाजगी दुकान आहे. बुधवारी रात्री साडेदहा वाजे दरम्यान दुकान बंद करून घराकडे येत असताना
बीड-परळी महामार्गावरील दिंद्रुड च्या सरस्वती नदीच्या पुलावर आयशर टेम्पो (एम एच 14 के ए 9315) ने दुचाकी ला पाठीमागून धडक देत दुचाकी जवळपास एक किलोमीटर फरफटत नेली. या अपघातात अशोक पांडुरंग ठोंबरे हा रस्त्यावर उडून पडला तर दुकानवर काम करणारा हमाल कांतीलाल खिराडे (रा.खुंदरी जि बडवाणी,मध्यप्रदेश) जवळपास एक किमी अंतर पर्यंत गाडी सह फरपटत गेला. दोघेही गंभीर जखमी झाले होते. अशोक ठोंबरे यास माजलगाव येथे प्रथमोपचार करून छत्रपती संभाजी नगर येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असता तेथील डॉक्टरांनी मयत घोषित केले. दुसरा गंभीर जखमी कांतीलाल खिराडे यास अंबेजोगाई येथील स्वराती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. याच आयशर टेम्पो ने पुढे दोन किलोमीटरवर जाऊन आणखीन एका दुचाकी स्वराला उडवल्याची माहिती असून त्याच्या तोंडाला गंभीर मार लागल्याची माहिती मिळाली. दिंद्रुड पोलिसांनी सदर आयशर टेम्पो ताब्यात घेतला आहे.