बीड, दि.8 (लोकाशा न्युज) ः बीड जिल्ह्याला शनिवारी दि.8 एप्रिल रोजी गारपिटीचा तडाखा बसला. शनिवारी सकाळपासूनच जिल्ह्याभरात अनेक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. तर अनेक ठिकाणी गारपिट झाल्याने शेतपिके जमिनदोस्त झाले. बीड, पाटोदा, शिरूर, केजसह इतर तालुक्यात वीज पडून अनेक जनावरे दगावली आहेत. रात्री उशिरापर्यंत याची आकडेवरी जिल्हा प्रशासनाकडे आली नव्हती. विशेष म्हणजे अंगावर विज पडून एका शेतकर्याचाही मृत्यू झाला आहे.
गेल्या आठवड्यात अवकाळी व गारपिटीने 3802 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झालेले आहे. याची भरपाई मिळण्यासाठी सहा कोटीच्या निधीची आवश्यकता असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने नुकताच दिला आहे. याची मदत मिळत नाही तोपर्यंतच काल शनिवारी दि.8 एप्रिल रोजी जिल्ह्याला पुन्हा अवकाळी व गारपिटीचा तडाखा बसला. शनिवारी सकाळपासूनच विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. त्यानंतर दुपारी वातावरण निवळले होते. मात्र, साधारण चार वाजल्यापासून जिल्ह्यात पुन्हा विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी गारपिट झाली. या गारपिटेमुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी विज कोसळून पशूधन दगावल्याच्या घटना घडल्या आहेत.
आष्टी तालुक्यातील सुरुडी येथील शेळ्या चारण्यासाठी शेतात गेलेल्या विजांचा कडकडाटासह जोराचा पाऊस आल्याने चिंचेच्या झाडाखाली आडोशा घेऊन बसलेल्या एका शेतकर्यांसह दोन शेळ्यांचा (दि.8) एप्रिल रोजी सायं.5 वा.अंगावर वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. महादेव किसन गर्जे (वय -60) हे मयत शेतकर्यांचे नाव आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, महादेव किसन गर्जे हे (दि.8) एप्रिल रोजी सायंकाळी 5 वा.च्या दरम्यान वादळी वार्यासह जोराचा पाऊस येऊ लागल्याने शेतात शेळ्या घेऊन चारण्यासाठी गेलेल्या विजेच्या कडकडटासह व जोराचा पाऊस सुरू झाल्याने चिंचेच्या झाडाखाली आडोशाला बसले असता शेतकर्यांचा वीज पडून दुर्देवी मृत्यू झाला तर दोन शेळ्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे.या घटनेची माहिती सुरुडीचे माजी सरपंच तथा दूध संघ व्हा.चेअरमन अशोक गर्जे यांनी दिली असता तात्काळ घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत पंचनामा करून आष्टी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येणार आहे. गर्जे कुटुंबातील कर्ता पुरुषाचा वीज पडून दुर्देवी मृत्यू झाल्याने सुरुडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी,तीन मुले,एक मुलगी सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.