बीड प्रतिनिधी : बीड जिल्हा कृषी महोत्सव २०२३ च्या भव्य कार्यक्रम मंडप स्टॉलचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्रीमती दिपा मुधोळ, सीईओ अजित पवार, यांचे हस्ते व अतिरिक्त मु का अधिकारी श्री वासुदेव सोळुंके, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर, आत्माचे प्रकल्प संचालक सुभाष साळवे यांच्या उपस्थितीत सोमवारी दि. २० फेब्रुवारी सकाळी ११ वाजता संपन्न झाले. यावेळी शेतीच्या आधुनिक प्रगतीसाठी बीड जिल्हा कृषी महोत्सव पाहण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती दिपा मुधोळ, सीईओ अजित पवार यांनी केले.
छत्रपती संभाजी महाराज मल्टिपर्पज ग्राउंडवर दोनशे स्टॉल उभारणीच्या कामाला उद्घाटन केल्यानंतर तात्काळ सुरुवात करण्यात आली आहे. दि. २४ ते २८ फेब्रुवारी २०२३ दरम्यान बीड जिल्हा कृषी महोत्सव पार पडणार आहे. प्रदर्शन स्थळी सकाळी जिल्हाधिकारी श्रीमती दिपा मुधोळ, सीईओ अजित पवार यांनी उपस्थिती लावून स्थळाची पाहणी केली. उद्घाटन दरम्यान बोलतांना श्रीमती जिल्हाधिकारी दिपा मुधोळ म्हणाल्या की, शेतीच्या शाश्वत विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती करून घेण्यासाठी बीड जिल्हा कृषी महोत्सव शेतकऱ्यांना महत्वाचा दुवा ठरणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या कृषी महोत्सवाला भेट देऊन आधुनिक शेतीचे तंत्रज्ञान आत्मसात करावे असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती दिपा मुधोळ यांनी केले.
या प्रदर्शनात सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयाचे स्टॉल असून शासकीय स्टॉलवर विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात येणार आहे. या कृषी प्रदर्शन,पशु प्रदर्शन,परिसंवाद/ चर्चा सत्र, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री व्यवस्था, शेतकरी सन्मान समारंभ, अत्याधुनिक कृषी अवजारे प्रदर्शन, शेतकरी उत्पादक कंपनी व सेंद्रिय शेती गट उत्पादित धान्य, फळे, फुले, भाजीपाला हे प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण असणार आहे.















