पुणे (चिंचवड) ।दिनांक १९।
पिंपरी चिंचवड भागात माझ्या मराठवाड्यातील लोकं मोठया प्रमाणात वास्तव्यास आहेत, त्यांच्या हितासाठी मी इथे आले आहे. आ. लक्ष्मण जगताप यांनी अनेक वर्षे इथल्या लोकांची खूप सेवा केली, तथापि त्यांच्या निधनाने जी पोकळी निर्माण झाली आहे, ती भरून काढण्यासाठी आपल्या आशीर्वादाची गरज आहे. जनतेचं प्रश्न सोडविण्यासाठी आश्विनी ताई जगताप हया सक्षम उमेदवार आहेत, त्यांना विक्रमी मतांनी विजयी करा हिच लक्ष्मण भाऊंवरील आपल्या प्रेमाची पावती असेल अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी मतदारांना आवाहन केलं.
पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजपा महायुतीच्या उमेदवार आश्विनी जगताप यांच्या प्रचारार्थ रहाटणी येथे आयोजित केलेल्या प्रचार सभेत त्या बोलत होत्या. खासदार श्रीरंग बारणे, आ. महेश लांडगे, आ. उमा खापरे, उमेदवार आश्विनी जगताप, माजी खासदार अमर साबळे, शिवाजीराव कव्हेकर, सदाशिव खाडे आदींसह महायुतीतील घटक पक्षांचे नेते व्यासपीठावर उपस्थित होते.
लोकनेते मुंडे साहेबांचं जाणं हे केवळ आमच्यासाठीच नव्हे तर हजारो, लाखो कार्यकर्त्यांसाठी धक्कादायक होतं. घरातला कर्ता पुरुष गेल्याचं दुःख काय असतं हे आम्ही अनुभवलयं. आश्विनी ताई देखील त्यातून जात आहेत, पण ज्या संयमाने त्या सामोरे जात आहेत ते मला भावले. मी आज इथे आले ते केवळ आणि केवळ लक्ष्मण भाऊंना आदरांजली आणि आश्विनी ताईच्या पाठिशी उभी राहण्यासाठी आले असं पंकजाताई यावेळी म्हणाल्या. लक्ष्मण जगताप यांनी अनेक वर्षे आपली सेवा केली, शहराच्या विकासाची स्वप्नं पूर्ण केली, जाचक कर माफ करण्यासाठी लढले, पण अचानक त्यांच्या जाण्यानं मोठी पोकळी निर्माण झाली आहे. राजकारणात जय पराजय असतो पण लोकांची सेवा अविरत ठेवली पाहिजे हे मुंडे साहेबांचे आमच्यावर संस्कार आहेत. या भागात माझ्या मराठवाड्यातील जनतेची संख्या जास्त आहे. लक्ष्मण भाऊंच्या नंतर आश्विनीताई आपल्या सेवेत असणार आहेत, हक्काने त्यांचेकडून काम करून घ्या. इथला प्राॅपर्टी कार्डचा प्रश्न आहे, मी स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटेन असा शब्द मी तुम्हाला देते. राज्यात आता आपलं सरकार आहे, त्यामुळे प्रश्न सुटण्यास वेळ लागणार नाही. आश्विनताईना विक्रमी मताधिक्य देऊन विजयी करणं हे आपल्या हितासाठी खूप महत्वाचं आहे, असं आवाहन पंकजाताईंनी यावेळी केलं.
कोण आली रे कोण आली… वाघिणीचे जल्लोषात स्वागत
पंकजाताई मुंडे यांचे या सभेत मतदारांनी जंगी स्वागत केले. भाषणास सुरुवात करण्यापूर्वी ‘कोण आली रे कोण आली..महाराष्ट्राची वाघिण आली’ असा एकच जल्लोष करत कार्यकर्त्यांनी सभेतला उत्साह आणखी द्विगुणीत केला. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या आठवणींना यावेळी अनेकांनी आपल्या भाषणात उजाळा दिला.
छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन ; गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यक्रमातही उपस्थित
दरम्यान पंकजाताई मुंडे यांच्या काल व आज पुणे दौऱ्याचा बिझी शेड्युल होता. काल दिवसभर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील पुस्तक विमोचनाच्या तसेच विविध कार्यक्रमाला त्या उपस्थित होत्या तर आज त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त चिंचवड मधील शिवगर्जना चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आश्विनीताई जगताप यांच्या प्रचारार्थ वाल्हेकरवाडी येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
••••















