Uncategorized

जिल्ह्यातील जि.प.च्या 33 विद्यार्थ्यांना मिळणार हवाई सफर, झेडपी 33 विद्यार्थ्यांची इस्त्रोसह अमेरिकेतील नासा अंतराळ संशोधन संस्थेची भेट घडवून आणणार, शैक्षणिक सहलीसाठी पालकमंत्र्यांनी केला निधी मंजूर


बीड, दि. 18 (लोकाशा न्यूज) : बीड जिल्हा परिषद अंतर्गत येणार्‍या जिल्हा परिषदेच्या शाळांमधून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोण निर्माण व्हावा, संशोधनवृत्तीचा विकास व्हावा, विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञांच्या कार्यपध्दतीची जवळून ओळख व्हावी, शास्त्रज्ञ निर्मितीस हातभार लागावा, विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील संशोधन प्रक्रियेची माहिती मिळावी या हेतूने इस्त्रोसह अमेरिकेतील नासाला हवाई मार्गे शैक्षणिक सहल आयोजित करण्यासाठी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सहकार मंत्री अतूल सावे यांनी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेतून निधी मंजूर केला आहे.
या सहलीसाठी विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी सीईओ अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय सनियंत्रण समिती गठीत केली आहे. या समितीत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासूदेव सोळंके, शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी, एक महिला वैद्यकिय अधिकारी व उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांचा समावेश करण्यात आला आहे. निधी, परिक्षा, परिक्षेचा वेळ, पेपर तपासणी, मुलांची सहल पुर्ण करणे ही जबाबदारी या समितीवर आहे. सदरील सहलीसाठी 11 तालुक्यातून परीक्षेव्दारे गुणानुक्रमे प्रत्येकी तीन या प्रमाणे इयत्ता पाचवी ते आठवीमध्ये शिकत असलेल्या 33 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येवून त्यांना इस्त्रो या अंतराळ संशोधन संस्थेला भेट देण्यासाठी शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात येणार आहे. याच 33 विद्यार्थ्यांपैकी निवडक 11 विद्यार्थ्यांना अमेरिकेतील नासा या अंतराळ संशोधन संस्थेला भेट देण्याची संधी मिळणार आहे. यासाठी दि. 27 फेब्रुवारी 2023 रोजी केंद्रस्तरावर वस्तूनिष्ठ बहुपर्यायी 50 प्रश्‍नांची व शंभर गुणांची परीक्षा घेवून प्रत्येक केंद्रातून गुणानुक्रमे 10 (पाच मुले, पाच मुली) विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. प्रत्येक केंद्रातून गुणानुक्रमे निवडलेल्या दहा विद्यार्थ्यांची दि. 3 मार्च 2023 रोजी तालुकास्तरावर वस्तूनिष्ठ बहुपर्यायी 75 प्रश्‍नांची 75 गुणांची व 25 गुणांच्या निबंधाची परीक्षा घेवून प्रत्येक तालुक्यातून गुणानुक्रमे 10 (पाच मुले व पाच मुली) विद्यार्थ्यांची निवड करण्यात येवून त्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे व त्यांची दि. 10 मार्च 2023 रोजी जिल्हास्तरावर त्यांची वस्तूनिष्ठ बहुपर्यायी 75 प्रश्‍नांची 75 गुणांची व 25 प्रश्‍नांच्या 25 गुणांची प्रात्यक्षीक परीक्षा घेवून प्रति तालुक्यातून गुणानुक्रमे तीन (पैकी एक मुलगी) अशा 11 तालुक्यातून 33 (पैकी 11 मुली) विद्यार्थ्यांची सहलीसाठी निवड करण्यात येणार आहे. या परिक्षेसाठी पाचवी ते आठवीच्या अभ्यासक्रमावर आधारित भौतिकशास्त्र, गणित, अ‍ॅस्ट्रोफिजीक्स, बायोकेमिस्ट्री, पर्यावरण आदी विषयांवर आधारित प्रश्‍नांचा समावेश असणार आहे. परिक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना दररोज एक तास अथवा गरजेनुसार अधिकचा तपास घेवून परिक्षेच्या अनुषंगाने पाचवी ते आठवीचे वर्ग असणार्‍या जिल्हा परिषदेच्या शाळांमधून शिक्षकांव्दारे मार्गदर्शन करण्याच्या तसेच परीक्षेच्या नियोजनासंबंधीच्या सुचना जिल्हास्तरावरून व्हीसीव्दारे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासूदेव सोळंके व शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुखांना दिल्या आहेत. या उपक्रमासाठी वरिष्ठ स्तरावरून विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे, सीईओ अजित पवार, उपायुक्त (विकास) उज्वला बावके-कोळसे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळत आहे. तसेच जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर चिंचाने यांनी निधी मंजूरीकरिता सहाय्य केले आहे.

निधी मंजूर केल्याबद्दल एसीईओंनी
पालकमंत्र्यांचे मानले आभार

या सहलीमुळे बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील झेडपीच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना विमान प्रवासाची तसेच इस्त्रो व अमेरिकेतील नासा या अंतराळ संशोधन संस्थांनामधून राष्ट्रीय स्तरावर संशोधन प्रक्रिया कशी चालते याविषयी प्रत्यक्ष अनुभवाव्दारे जाणून घेण्याची संधी मिळणार आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोण निर्माण होण्यास, संशोधनवृत्तीचा विकास होण्यास तसेच शास्त्रज्ञांच्या कार्यपध्दतीचा विकास होण्यास तसेच शास्त्रज्ञांच्या कार्यपध्दतीची जवळून ओळख होण्यास तसेच शास्त्रज्ञांच्या कार्यपध्दतीची जवळून ओळख होण्यास हातभार लागून परिक्षेव्दारे निवड होणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा निर्माण होवून बीड जिल्ह्याच्या गुणवत्ता वाढीसाठी हा उपक्रम पुरक ठरणार असल्याचे झेडपीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी वासूदेव सोळंके यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे या उपक्रमासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी पालकमंत्र्यांचेही आभार मानले आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!