माजलगाव, दि. 6 लोकाशा न्युज :
ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असुन माजी मंत्री पंकजाताई मुंडे आणि
खा. प्रितमताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली रेणापुरी ग्रामपंचायत बिनविरोध आली असुन मागील 45 वर्षांपासुनची परंपरा गावाने कायम ठेवली आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सरपंच पदासाठी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर रस्सीखेच सुरू आहे परंतु रेणापुरी या पुनर्वसित ग्रामस्थांनी मागील 45 वर्षांपासुन असलेल्या परंपरेचा इतिहास कायम ठेवत रेणापुरी ग्रामपंचायत बिनविरोध ठेवली आहे. माजी मंत्री पंकजाताई मुंडे आणि खा. प्रितमताई मुंडे
यांच्या नेतृत्वाखाली रेणापुरी ग्रामपंचायत भाजपाच्या ताब्यात आली आहे. बाजार समितीचे सभापती नितीन नाईकनवरे यांच्या निवासस्थांनी किशनराव नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत सर्वांनुमते ग्रामपंचायत बिनविरोध काढण्याचा निर्णय झाला. यावेळी ग्रामस्थांनी गावाच्या विकासासाठी उमेदवारी अर्ज अथवा पॅनॉल न टाकण्याचा निर्धार करत रेणापुरी ग्रामपंचायत बिनविरोध काढण्याची परंपरा कायम ठेवली. सरपंचपदासाठी केवळ सौ. विमल किशनराव नाईकनवरे यांचा अर्ज आल्यामुळे सरपंच पदाची माळ विमल नाईकनवरे यांच्या गळ्यात पडणार आहे तर ग्रामपंचायत सदस्यासाठी केवळ नितीन किशनराव नाईकनवरे, राम उध्दवराव चोरगे, सौ. रोहिणी भिवराज नाईकनवरे, सौ. अनुराधा अशोक नाईकनवरे, सौ. कोमल राजाभाउ पांचाळ, भीमा राजाराम घडसे, सौ. सीताबाई श्रीपती घडसींगे यांचे सात अर्ज आल्याने हे सातही सदस्य बिनविरोध निवडुण येण्याचा मार्ग आता मोकळा झाला असुन केवळ विजयी उमेदवार म्हणुन घोषित करण्याचे व शिक्कामोर्तब करण्याचे बाकी आहे.
- चौकट –
रेणापुरी गावाच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबध्द असुन खा. प्रितम ताई मुंडे व माजी मंत्री पंकजा ताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली रेणापुरीमध्ये विकासात्मक कामे करण्याबरोबरच महिला सबलीकरण व सक्षमीकरण करण्यावर भर देणार आहे. – सौ.विमल किशनराव नाईकनवरे, सरपंच - चौकट –
तालुक्यामध्ये रेणापुरी ग्रामपंचायत ही पहिली ग्रामपंचायत बिनविरोध आली असुन खा. प्रितम ताई मुंडे व पंकजा ताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही ग्रामपंचायत काम करेल. रेणापुरी ग्रामपंचायत आदर्श ग्रामपंचायत म्हणुन राज्यात काम करेल. – नितीन नाईकनवरे, ग्रामपंचायत सदस्य.