परळी दि. २४ —– भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांचा २६ जूलै हा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्याचा निर्णय भाजपच्या कार्यकर्त्यांनी घेतला असून त्यानिमित्त दंतरोग चिकित्सा, रक्तदान शिबीर, गरजू महिलांचा दहा लाखाचा विमा, शिलाई मशीन वाटप यासह विविध भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन यावेळी करण्यात आलं आहे.
पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक आज पार पडली. शहर व तालुक्यातील कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. आपला वाढदिवस समाजातील वंचित, पिडित घटकांची सेवा करून साजरा करावा असं आवाहन पंकजाताई मुंडे यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे, त्यानुसार शहर व ग्रामीण भागात गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, वह्या, गरजू महिलांना शिलाई मशीन, भारतीय डाक विभागाचा दहा लाखांचा अपघात विमा, दंतरोग चिकित्सा, रक्तदान शिबीर, रूग्णांना फळ आणि ब्लॅकेट वाटप, प्रभू वैद्यनाथ आणि कपीलधार तीर्थक्षेत्री अभिषेक, दर्ग्यास चादर आदी उपक्रम यावेळी राबविण्यात येणार आहेत. जिल्हाभरात देखील अशाच सामाजिक उपक्रमांनी पंकजाताईंचा वाढदिवस साजरा करण्यात येणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले आहे.
••••