बीड, दि. 18 (लोकाशा न्यूज) : बीडमध्ये संताप आणणरी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका बापानं आपल्याच मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. मुलीचा आरडाओरडा ऐकू आल्यानंतर आई बाहेर आली. तेव्हा बापाने तिलाही जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी आता बीड पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेत माथेफिरु बापाला अटकही केली आहे. पोलीस आता याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
बीड जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात ही खळबळजनक घटना घडली आहे. अख्खा शिरुर तालुका या घटनेनं हादरला असून पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. शिरुर तालुक्यातील एका गावात राहणारी 13 वर्षांची एक अल्पवयीन मुलगी अंगणातील बाजेवर झोपली होती. यावेळी नराधम बापाने तिला खाली झोपायला सांगितलं. पीडित मुलीनं आरडाओरडा केल्यानंतर अल्पवयीन मुलीच्या आईला जाग आली. त्यानंतर आईलाही देखील बापानं जीवे मारण्याची धमकी दिली. पीडित मुलगी ही आठवीत शिकते. ती 13 जूनच्या मध्यरात्री घराच्या अंगणात झोपली असता हा संतापजनक प्रकार घडला आहे. याबाबत पीडित मुलीनं दिलेल्या फिर्यादीवरुन आता शिरुर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील नोंद करुन घेण्यात आला आहे. मुलीच्या तक्रारीनंतर आरोपी असलेल्या नराधम बापालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याची कसून चौकशी केली जातेय. या नराधम बापाचं वय 36 वर्ष आहे. त्याच्या भा.द.वि. कलम 376 सोबत बाललैंगिक अत्याचार विरोधी कलम 4,6,8 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.