बीड, दि. 6 (लोकाशा न्यूज) : दुचाकी चोरांच्या टोळीतील तिघांना बीड स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. सोमवारी (दि.06) रोजी सकाळी अंबाजोगाई, धारूर आणि तेलगाव परिसरात ही कारवाई करण्यात आली. दरम्यान अन्य चार चोरटे फरार असून पोलिस त्यांचाही शोध घेत आहेत. ताब्यात घेतलेल्या दुचाकी चोरांकडून चोरीच्या तब्बल 11 दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या आहे.
ऋषीकेश मधुकर चव्हाण (23, रा.नांदगाव ता.अंबाजोगाई), अक्षय शिवाजी तिडके (19, रा.भोगलवाडी ता.धारूर) आणि आकाश प्रकाश चव्हाण (20, रा.बडुळी तांडा, तेलगाव ता,धारूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. गत काही महिन्यांपासून दुचाकी चोरींचे गुन्हे वाढलेले आहेत. या गुन्ह्यांच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेकडून आरोपींचा शोध सुरू होता. दुचाकी चोरणार्या टोळीतील काही सदस्य जिल्ह्यात फिरत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने अंबाजोगाई, धारूर व तेलगाव परिसरातून 3 चोरट्यांना अटक केली. या चोरट्यांकडून चोरीच्या 11 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या चोरट्यांकडून अंबाजोगाई शहर ठाणे हद्दीतील आठ, तसेच दिंद्रुड 1 व मुंबई शहर ठाणे हद्दीतील 1 अशा एकूण 10 दुचाकी चोरीचे गुन्हे उघड झाले आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अपर अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा निरीक्षक सतीश वाघ, उपनिरीक्षक संजय तुपे, कर्मचारी नसीर शेख, कैलास ठोंबरे, गणेश हांगे, गणेश मराडे, अशोक दुबाले, सतीश कातखडे, संपत तांदळे आदिंनी केले. अन्य चार फरार आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.