बीड, दि. 18 (लोकाशा न्यूज) : आरोग्य शिबीरातून सर्वसामान्य रुग्णांना फायदा होतो. त्यासाठी दोन महिन्यातून एकदा अशा पद्धतीचे आरोग्य शिबीर आयोजीत करावेत, असे आवाहन करत सुंदर वार्ड’ ही संकल्पना चांगली आहे. वार्डामध्ये रुग्णांच्या सुविधेसाठी भौतिक सुविधा असणे गरजेचे आहे, असे सांगत आरोग्यात कोणीही राजकारण करू नये, असा चिमटा यावेळी खा. प्रीतमताई मुंडे यांनी विरोधकांना काढला.
स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त केंद्र सरकारतर्फे सुरू असलेल्या ‘आझादी का अमृत महोत्सव’ कार्यक्रमामार्फत बीड जिल्हा रुग्णालयात आयोजित आरोग्य मेळाव्याचे सोमवारी सकाळी खा. प्रीतमताई मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाला अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, जिल्हा परिषदेचे सीईओ अजित पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी गित्ते, संगीता चव्हाण, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, आरएमओ सुखदेव राठोड, सुधीर राऊत, राम आव्हाड, डॉ. लोद मॅडम, मेट्रन रमा गिरी, प्राचार्या सुवर्णा बेंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. आरोग्य शिबिरानिमित्त रुग्णालय परिसरात विविध आजारांची आणि त्याविषयीच्या उपाययोजनांची माहिती देणारे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत, याठिकाणी भेट देऊन पाहणी केली. अतिशय सखोल ज्ञान आणि सुलभ व सोप्प्या भाषेत इथे नागरिकांना आरोग्यविषयक माहिती दिली जात आहे, दिवसभर हे स्टॉल सुरू ठेवण्यात आले, यामुळे नागरीकांचे आरोग्यविषय ज्ञान समृद्ध झाले, कोरोनाच्या कठीण काळात उल्लेखनीय कार्य करणार्या कर्मचार्यांनी भीम जन्मोत्सव निमित्त रुग्णालयात सुंदर माझा वार्ड’ ही संकल्पना राबवून आरोग्य कक्ष अतिशय सुंदर आणि स्वच्छ ठेवले आहेत, यासाठी त्यांचा सन्मान करण्याचे ही भाग्य मला लाभले, असेही यावेळी खा. मुंडे म्हणाल्या. यावेळी त्यांच्या हस्ते रुग्णालयात नव्याने सुरू करण्यात आलेल्या इंडोस्कोपी युनिटचेही उद्घाटन करण्यात आले.
इंडोस्कोपी युनिटचेही ताईंच्या हस्ते
केले उद्घाटन
यावेळी खा. मुंडे बोलताना म्हणाल्या की, अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने हे महाआरोग्य शिबीर आयोजीत करण्यात आलेले आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने हे शिबीर होत आहे. शिबिराच्या माध्यमातून गोरगरीबांना चांगला फायदा होत असून अशा पद्धतीचे शिबीर दोन महिन्यातून एकदा व्हायला हवेत. वेगवेगळ्या आजारांवर शिबिरे व्हावेत, असे सांगत सुंदर वार्ड’ ही संकल्पना अत्यंत चांगली असून वॉर्डामध्ये रुग्णांच्या सुविधेसाठी भौतिक सुविधा असणे तितकेच गरजेचे असल्याचे खा. मुंडे यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे यावेळी रूग्णालयातील इंडोस्कोपी युनिटचेही खा. प्रीतमताईंच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.















