परळी, 24 (लोकाशा न्यूज) : वैद्यनाथ साखर कारखान्याने पुढील गळीत हंगाम वेळेवर सुरू करून विक्रमी गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे, असे सांगून केंद्रीय सहकार मंत्री ना. अमित शहा यांच्या सहकार्याने साखर उद्योगाला पुन्हा चांगले दिवस येतील, असा विश्वास कारखान्याच्या अध्यक्षा पंकजाताई मुंडे यांनी सभासदांसमोर बोलतांना व्यक्त केला. दरम्यान, अनेक अडचणींवर मात करून गळित हंगाम यशस्वीरित्या सुरू केल्याबद्दल शेतकरी व संचालक मंडळाने त्यांचे या सभेत आभार मानले आहेत. वास्तविकत: यावर्षीचा गाळप हंगाम व्यवस्थित सुरू आहे. कारखाना उशीरा सुरू झाल्याने प्रोग्राम थोडा लेट आहे. पण शेतकर्यांनी काळजी करू नये. सर्व ऊसाचे गाळप केले जाणार आहे अशी ग्वाही यावेळी पंकजाताई मुंडे यांनी दिली. आगामी काळात कारखाना आर्थिक सक्षम होणार आहे, याचा शेतकरी, ऊसतोड मजूर, आणि सर्व उद्योगांना फायदाच होणार आहे, असेही त्या म्हणाल्या.
पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरूवारी ऑनलाईन पद्धतीने उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली, त्यावेळी पंकजाताई बोलत होत्या. बहुसंख्य सभासदांनी ऑनलाईन उपस्थित राहुन सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रारंभी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेवराव आघाव यांनी पंकजाताई मुंडे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. संचालक व्यंकटराव कराड यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत कारखाना सुरू करून शेतकर्यांना दिलासा दिल्याबद्दल पंकजाताई मुंडे यांचे ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोड मजूर आणि कर्मचारी यांच्या वतीने आभार व्यक्त केले. यावेळी बोलताना पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या विचारांचा वारसा चालवत असताना शेतकरी, शेतमजूर, ऊसतोड कामगार, कर्मचारी यांचा विचार करून आणि आर्थिक अडचणींवर मात करून कारखाना सुरू केला आहे. केंद्रीय सहकार मंत्री ना. अमित शहा यांनी सहकारी कारखान्यांना आधार देणारे निर्णय घेतले त्याचाही फायदा झाला आहे. आगामी काळात साखर कारखान्यांना आर्थिक सहकार्य करण्याची त्यांची भूमिका असल्याने हा उद्योग आर्थिक संकटातून बाहेर येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रारंभी सभेचे अहवाल वाचन कार्यकारी संचालक जी. पी. एस. के. दिक्षीतुलू यांनी केले तर आभार प्रदर्शन जेष्ठ संचालक फुलचंद कराड यांनी केले. सभेचे संचलन जनसंपर्क अधिकारी ज्ञानोबा सुरवसे यांनी केले. संचालक सर्वश्री पांडुरंगराव फड, श्रीहरी मुंडे, ज्ञानोबा मुंडे, दत्तात्रय देशमुख, केशवराव माळी, शामराव आपेट, गणपतराव बनसोडे, भाऊसाहेब घोडके, आश्रोबा काळे, किशनराव शिनगारे, त्रिंबकराव तांबडे, संदीप लाहोटी, रमेश कराड, सतीश मुंडे आदींची यावेळी उपस्थिती होती. सर्व संचालक मंडळ आणि बहुसंख्य सभासदांनी ऑनलाईन उपस्थिती लावली.
गुढी पाडव्याला सभासदांना
मिळणार दहा किलो साखर
दरम्यान गुढी पाडव्यासाठी वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना प्रति शेअर्सला 10 किलो साखर वाटप करण्यात येणार आहे. यासाठी प्रति किलो रूपये 25 भाव निश्चित करण्यात आला असल्याचे अध्यक्षा पंकजाताई मुंडे यांनी सांगितले.