परळी । दिनांक ०५ ।
भाजपचे राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी शहरातील महिला व नागरिकांना जागतिक महिला दिनाची खास भेट दिली आहे. महिला दिनाचे औचित्य साधून गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने उद्या भव्य मोफत सर्व रोग निदान आरोग्य तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. आरोग्य तपासणी बरोबरच १८ ते २५ वयोगटातील मुला-मुलींचे लसीकरण, केंद्र सरकारच्या “राष्ट्रीय वयोश्री योजने”च्या जिल्हयातील नोंदणीचा शुभारंभ यावेळी होणार आहे.
उद्या ६ मार्च रोजी सकाळी ९ ते दुपारी ५ या वेळेत राणी लक्ष्मीबाई टॉवर जवळील कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात हे शिबीर होणार आहे. या शिबिरात स्त्री रोग, बालरोग, र्हदय रोग, त्वचा रोग, नेत्र रोग, कान - नाक - घसा, अस्थी रोग, जनरल सर्जरी, दमा व छातीचे विकार, दंत रोग, मुत्रविकार, अस्थी रोग आदींची तपासणी करून औषधोपचार केले जाणार आहेत. या शिबिरात परळी - वैजनाथ, अंबाजोगाई सह बीड जिल्हयातील तज्ज्ञ डॉक्टर सहभागी होऊन रूग्णांची तपासणी, उपचार करणार आहेत.
शस्त्रक्रियाही मोफत
शिबीरामध्ये तपासणी झाल्यानंतर रूग्णांचा आजार व गरजेनुसार डाॅक्टरांच्या सल्ल्याने शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने या शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहेत. या शिबीराचा परळी मतदार संघातील गरजू रूग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
लसीकरण व वयोश्री योजना
या शिबिरात १८ ते २५ वयोगटातील मुला मुलींचे लसीकरण करण्यात येणार आहे. विशेषतः मुलींसाठी हे लसीकरण होणार आहे.जेष्ठ नागरीक, दिव्यांगांना केंद्र सरकारकडून आवश्यक साहित्य मोफत उपलब्ध करून देणार्या “राष्ट्रीय वयोश्री” योजनेच्या नोंदणीचा जिल्ह्याचा शुभारंभ खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते यावेळी होणार आहे. शिबीर, लसीकरण व नोंदणीचा गरजुंनी लाभ घ्यावा असे आवाहन गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान, सर्वरोग निदान शिबीराची तयारी पूर्ण झाली असून रूग्णांच्या तपासणीसाठी स्वतंत्र कक्षाची निर्मीती करण्यात आली आहे.
••••