बीड, दि. 5 (लोकाशा न्यूज) : नुकत्याच पार पडलेल्या नगर पंचायत निवडणूकीमध्ये जिल्ह्यात भाजपाला चांगले यश मिळाल्यानंतर येणार्या जिल्हा परिषद व नगर परिषद निवडणूकांच्या अनुषंगाने भाजपाने कंबर कसल्याचे दिसत आहे. बीड नगर परिषदची निवडणूक भाजपा स्वबळावर लढवणार असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी दिली. यासह शहरातील विकास कामांसाठी 600 कोटींचा विकास निधी भाजपाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आला आहे. परंतु याचे श्रेय दोन्ही क्षीरसागर घेताना दिसत अल्याचे मत सुद्धा यावेळी मस्के यांनी व्यक्त केले. 350 कोटींची अमृत योजना, 250 कोटींची भुयारी गटार योजना आमच्याच सरकारने मंजूर केली, दोन्ही तलाव भरलेले असताना 15 दिवसाला बीडकरांना पाणी मिळते, साधे विज बिल भरण्यासाठी नगर पालिकेकडे पैसे नाहीत, फक्त कुरण म्हणून आतापर्यंत बीड नगर पालिकेचा वापर दोन्ही क्षीरसागरांनी केला, टक्केवारी कोणी घ्यायची यासाठीच आता दोघांमध्ये वाद सुरू आहे, मंजूरी असतानाही कामे होत नाहीत मग घोडं कुठ आडतं, असा सवाल यावेळी मस्केंनी केला. तसेच बीड नगर पालिकेतून क्षीरसागरांना हद्दपार करा, असे अॅड सर्जेराव तांदळे म्हणाले, तर मुंडे भगिनींनी मंजूर केलेल्या कामावरच दोन्ही क्षीरसागर राजकारण करत असल्याचे सलिम जहाँगिर यांनी म्हटले. एकदरितच बीड क्षीरसागर मुक्त करण्यासाठी भाजपच्या पदाधिकार्यांनी हाबूक ठोकल्याचे यावेळी दिसून आले.
जिल्हा भाजपच्या वतीने शनिवारी दुपारी बीड शहरातील भाजपा कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेस जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे, प्रा.देविदास नागरगोजे,नवनाथ शिराळे, सलीम जहागीर,शहर अध्यक्ष भगीरथ बियाणी,अजय सवाई,डॉ लक्ष्मण जाधव,संग्राम बांगर, शांतीनाथ डोरले,कपिल सौदा,आदि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. बीड नगर परिषदेची आगामी काळात होऊ घातलेली निवडणूक भारतीय जनता पार्टी स्वबळावर लढवणार असून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस,शिवसेना या महाविकास आघाडीला नगर पालिकेतून हद्दपार करून बीड नगरपरिषद क्षीरसागर मुक्त करण्याचा निर्धार भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. बीड शहरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून शहरातील नागरिकांना रस्त्यात असणारे खड्डे आणि धुळी मुळे श्वसनाचे आजार जडले आहेत. पिण्याचे पाणी पंधरा वीस दिवस मिळत नाही. रस्त्यावरील पथदिवे कायम बंद असतात. या सर्व समस्यांमुळे बीडकर जनता त्रस्त झाली आहे. नगराध्यक्ष भारत भूषण क्षीरसागर व आमदार संदीप क्षीरसागर हे भाजप सरकारच्या काळात आलेल्या अमृत अटल योजना, भुयारी नाल्यांची योजना किंवा रस्त्यांच्या कामाचे श्रेय घेण्यासाठी धडपडतात. परंतु महाविकास आघाडी सरकारकडून त्यांनी शहराच्या विकासासाठी कसलाही निधी आणलेला नाही. भारतीय जनता पार्टी आता बीड शहराच्या दुरावस्थेला जबाबदार असणार्या क्षीरसागरांना बीड नगरपालिकेतून हद्दपार करणार असून बीड शहरातील जनतेला पारदर्शक आणि चांगला कारभार करणारे उमेदवार देऊन आगामी निवडणुकीत पूर्ण ताकतीने निवडणूक स्वबळावर लढवणार आहे. भारतीय जनता पार्टीच्या संघर्ष योद्धा या जिल्हा कार्यालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी,बीड नगरपरिषद निवडणूक 2022 संदर्भात स्पष्ट भूमिका मांडली. शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी प्रस्ताविक करून पत्रकारांचे स्वागत केले तर अजय सवाई यांनी आभार मानले.
क्षीरसागर भाजपमध्ये येणार ह्या फक्त वावड्याच
दोन्ही क्षीरसागर एकाच माळेचे मणी आहेत, जयदत्त क्षीरसागर हे भाजपमध्ये येणार अशी चर्चा ऐकायला मिळत आहे. मात्र ह्या फक्त वावडड्याच आहेत. केवळ स्वत:ची चर्चा घडवून आणण्यासाठी अशा चर्चा जाणून बुजून केल्या जात असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.