बीड, दि. 3 (लोकाशा न्यूज) : नेत्याची काम करण्याची पध्दत, शक्ती, कामातून निर्माण केलेला विश्वास हे सगळं लक्षात घेवूनच त्या त्या नेत्यांवर योग्य आणि महत्वाची जबाबदारी सोपविली जाते, अगदी याचप्रमाणेच जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती जयसिंह सोळंके यांनी आपल्या कामातून, कर्तृत्वातून सर्वांचे लक्ष वेधून घेतलेले आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचाही विश्वास त्यांनी जिंकलेला आहे. त्यामुळेच पवारांनी त्यांच्याकडे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या बीड जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिलेली आहे, याबरोबरच आता त्यांची मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यकारी मंडळ सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. कै. भिमराव जाधव यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागी त्यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र त्यांना सरचिटणीस आ. सतिश चव्हाण यांनी सोमवारी पाठविले आहे, त्यानुसार जयसिंह सोळंके या मंडळावरही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटणारच असा विश्वास बीड जिल्ह्यातील नागरिकांना आहे.