परळी वैजनाथ दि ३० ( लोकाशा न्युज ) :- आपण नेहमी दुकान फोडी, घरफोडी, वाहनचोरी, अशा अनेक चोरीच्या घटना घडलेल्या आपण ऐकतो मात्र परळी शहरांमध्ये चक्क २० लाखांच्या १२४ गाढवांची चोरी झाली असल्याची तक्रार शहर पोलिस ठाण्यांमध्ये जवळपास ३४ गाढव मालकांनी दिली आहे. आमचा हा उदरनिर्वाहाचा साधन असल्याकारणाने याचा त्वरित तपास लावून आम्हास न्याय द्यावा अशी मागणी मालकांच्या वतीने करण्यात आली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार अमोल मोरे आणि त्यांच्या सोबतच्या ३४ जणांच्या स्वाक्षऱ्या असलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दि. २५ ते २७ ऑक्टोबर दरम्यान रात्रीच्या सुमारास आमचे १२४ गाढव चोरीस गेली आहेत. मोंढा मार्केट, राणी लक्ष्मीबाई टॉवर, वैद्यनाथ मंदिर परिसर आणि नाथ चित्र मंदिर परिसरातून ही चोरी झाल्याचे तक्रारदारांनी दिलेल्या अर्जात म्हटले आहे. उदरनिर्वाहाचे साधन असलेली आमची गाढवे शोधावीत व गुन्हेगारांना शिक्षा करावी अशी विनंती परळी शहर पोलिसांना दिलेल्या तक्रार अर्जातून करण्यात आलेली आहे. चोरीस गेलेल्या १२४ गाढवांची बाजारभाव किंमत सरासरी प्रत्येकी १५ हजार सांगण्यात येत असून त्याची अंदाजे एकूण किंमत वीस लाखांच्या घरात आहे. सदर गाढवांवरचहो आमचा आणि आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून असून आमच्यावर भविष्यात उपासमारीची वेळ येऊ शकते तेव्हा चोरीचा योग्य दिशेने तपास लावून आम्हाला न्याय द्यावा अशी एकमुखी मागणी अमोल मोरे यांच्यासह गोविंद लांडगे, संतोष मोहिते, बालाजी बावणे, राजू पापा पवार, मोहन पवार, बाळू जीवा जाधव, विष्णू घटमल, संग्राम घटमल, दत्ता बावणे, वाघेश कोपर्डे, राजू घटमल, श्याम मोरे, सूर्यभान मोरे, राजू पवार, सोमनाथ पवार, बाळू मोहीते, राजू पवार, अंबादास घटमल, पिराजी मोरे, मुंजाजी घटमल, संजीव मोहिते, संजीव मोरे, मैनाजी घटमल, राजू मोहिते, बालाजी मोहिते, बाळू बावणे, सयाजी गवते, शाहू पवार, पिंटू जाधव, वैजनाथ मोहिते, अर्जुन बावणे आदींनी केली आहे.















