गेवराई दि.४ (प्रतिनिधी ) सरकार आपले आहे त्यामुळे कसलीही अडचण येणार नाही. विकासकामांना निधी कमी पडणार नाही. येणाऱ्या काळातही विविध योजनांच्या माध्यमातून विकासकामे केली जातील, कोणतीही तडजोड केली जाणार नाही. आपण सहकार्य करावे आणि होणारी कामे दर्जेदार होण्यासाठी लक्ष घालावे असे आवाहन माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी केले. धोंडराई येथे विविध विकासकामांचा शुभारंभ करताना ते बोलत होते.
धोंडराई येथे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांच्या शुभहस्ते कन्या शाळा खोली इमारत ७ लाख रुपये, गाव अंतर्गत सिमेंट रस्ता १० लाख रुपये, खंडोबा मंदीर पेवर ब्लाँक ३ लाख रुपये, हनुमान मंदिर पेवर ब्लाँक ९ लाख रुपये किंमतीच्या विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, जि. प. चे माजी सभापती भारतराव खरात, जि. प. सदस्य फुलचंद बोरकर, भास्करराव खरात, नारायण नवले, मच्छिंद्र खरात, सचिन खरात, राहुल खरात आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.