बीड, दि. 21 (लोकाशा न्यूज) : पोलीस अधीक्षक, बीड यांच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या चालक पोलीस शिपाई (36) पदांची भरती करण्यासाठी दि.30 नोव्हेंबर 2019 रोजी जाहीरात प्रसिध्द करण्यात आलेली होती. सदर परीक्षा ही आज दि. 22 सप्टेंबर 2021 रोजी उमेदवारांची लेखी परिक्षा घेण्यात येणार आहे. त्याअनुषंगानेच पोलिस अधीक्षक राजा रामा स्वामी यांनी अहवान केले आहे. परीक्षा ही दि.22 सप्टेंबर 2021 रोजी 11:00 वा . ते 12:30 वा . पर्यंत घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रावर उमेदवारांना 09:00 वा . ते 10:30 वा.पर्यंत प्रवेश दिला जाईल. 10:30 वा नंतर कोणत्याही उमेदवाराला परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी सदर संकेतस्थळावरून डाऊनलोड करून प्रिंट केलेले मुळ स्वरूपातील प्रवेशपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. उमेदवारांची तपासणी झडती , थर्मो गनच्या सहाय्याने उमेदवारांच्या शारिरीक तापमानाची तपासणी प्रवेशद्वारावर करण्यात येईल, उमेदवारांनी मास्क सोबत घेवून येणे. ओळखीच्या पुराव्यासाठी स्वत : चे आधारकार्ड ( ई – आधारकार्डला मान्यता नाही ) , निवडणूक आयोगाचे ओळखपत्र , पासपोर्ट , पॅनकार्ड , ड्रायव्हिंग लायसन यापैकी किमान कोणतेही एक मुळ ओळखपत्र तसेच उमेदवाराचे छायाचित्र व इतर मजकूर सुस्पष्टपणे दिसेल अशी मुळ ओळखपत्राची छायांकित प्रत परीक्षेच्या वेळी स्वतंत्रपणे सादर करणे अनिवार्य आहे. अन्यथा प्रवेश नाकारण्यात येईल. परीक्षा केंद्रामध्ये फक्त संकेतस्थळावरून डाऊनलोड करून प्रिंट केलेले मुळ स्वरूपातील प्रवेशपत्र, काळा / निळा बॉल पॉईंट पेन, मुळ वैध ओळखपत्र , मुखपट ( मास्क ) एवढेच साहित्य घेवून जाण्यास परवानगी आहे. परवानगी नसलेले अन्य कोणतेही साहित्य सोबत बाळगल्यास ते सुचनांचे उल्लंघन समजून कारवाई करण्यात येईल. सोबत आणलेले साहित्य परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारावर ठेवल्यास व ते गहाळ झाल्यास त्याची जबाबदारी या कार्यालयाची राहणार नाही. परीक्षा सुरू झाल्यानंतर ती संपेपर्यंत व सर्व उत्तर पत्रिका जमा होईपर्यंत कोणत्याही उमेदवारास परीक्षा केंद्राच्या बाहेर जाता येणार नाही . कोव्हिड -19 विषाणू प्रादुर्भावाच्या अनुषंगाने प्रशासनाने वेळोवेळी जारी केलेल्या सर्व सुचनांचे / आदेशांचे काटेकोरपणे पालन करावे, जे उमेदवार लेखी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतील त्यांची शारिरीक पात्रता तपासण्यापुर्वी सर्व मुळ कागदपत्रांची तपासणी करण्यात येईल. उमेदवारांना अवाहन करण्यात येते की , पोलीस भरती -2019 ची प्रक्रिया पार पाडताना सीसीटिव्ही कॅमेरा, व्हीडीओ, चित्रीकरण तसेच अत्याधुनिक डिजीटल यंत्रणांचा वापर करून अत्यंत पारदर्शक पध्दतीने भरती करण्यात येणार आहे. त्यामुळे संपूर्ण भरती प्रक्रियेमध्ये कोणत्याही उमेदवारांनी गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करू नये, असे अवाहन करण्यात येत आहे. पोलीस भरती मध्ये काही लोक दलालामार्फत भरतीत निवड करण्याचे प्रलोभन दाखवून उमेदवारांची दिशाभुल करून उमेदवारांकडे पैशांची मागणी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. उमेदवारांनी अशा अमिषाला बळी न पडता याबाबत काही निदर्शनास आल्यास किंवा कोणी पैशाची मागणी केल्यास तात्काळ जिल्हा पोलिस दलास संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक राजा रामा स्वामी यांनी केले आहे.