कडा ( बीड ) : आष्टी तालुक्यातील रुईनालकोल येथील संत शेख महमंद बाबा दर्गाहची शंभर एकर जमिन बनावट समंतीपत्राआधारे बळकावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे . या प्रकरणी सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून ते जामिनावर बाहेर आहेत . दरम्यान , आता या प्रकरणात बनावट दस्तावेज करणारा मास्टर माइंड मनोज ‘ मन्ना ‘ रत्नपारखे यास आष्टी पोलिसांनी रविवारी अटक केली .
आष्टी तालुक्यातील रुईनालकोल येथील संत शेख महमंद बाबा दर्गाची जमीन दस्तगीर महमंद शेख महंमद बाबा दर्गा या देवस्थानाच्या सेवेसाठी खिदमत मास शेख दस्तगीर महंमद यांना प्रदान करण्यात आलेली आहे . शेख कुटुंबीयांकडे ही पार्जित आहे . शेख बाबूलाल , शेख महंमद , शेख हजरत , शेख रशीद , शेख निजाम , शेख दस्तगीर , शेख गुलाब असे मिळून जिमनीची देखभाल करत होते . पण 2020 मध्ये या जमिनीची परस्पर खरेदी झाल्याचे समजात याचा पाठपुरावा करून बनावट व खोटे दस्तावेज निदर्शनास येताच ३ सप्टेंबर रोजी आष्टी पोलिस ठाण्यात सहा जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता . यात तीन प्राध्यापक , एक मुख्याध्यापक , एक विद्यमान सरपंच व अन्य एकाचा समावेश होता.
या प्रकरणातील देवस्थानाची जमीन परस्पर खरेदी करण्यासाठी कोणी रसद पुरवली , महसुल दरबारी कोणी चकरा मारल्या , कोणत्या अधिकाऱ्यांला हाताशी धरले , याचा मास्टर माईड कोण ? हे शोधणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते . दरम्यान , आरोपींची पोलिस कोठडी संपताच ते जामिनावर सुटले . तेव्हापासून आष्टी पोलिस जमीन परस्पर नावावर करण्यासाठी बनावट दस्तावेज तयार करणारा यातील मास्टर माइंड असलेला मनोज उर्फ मुन्ना रत्नपारखे ( रा.आष्टी ) याच्या मागावर होते . रविवारी खबऱ्याने आरोपी मुन्ना आष्टी पोलिस ठाणे हद्दीत असल्याची माहिती दिली . यावरून पोलिस किम चाऊस , सचिन कोळेकर , रियाज पठाण , वाहनचालक अरूण कांबळे यांनी सापळा रचून दुपारी ताब्यात घेतले . या प्रकरणात आणखी कोणाचा समावेश आहे ? कोणाची मदत घेतली ? हे मुन्नाच्या तपासातून पुढे येईल अशी माहिती पोलिस निरीक्षक सलिम चाऊस यांनी सांगितले .