टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) भारताला आणकी एक पदक मिळालं आहे. मीराबाई चानूनंतर (Mirabai Chanu) बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूला (PV Sindhu) या ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल मिळालं आहे. सिंधूने चीनच्या बिंग जियाओचा दोन सरळ सेटमध्ये 21-13, 21-15 ने पराभव केला. पी.व्ही सिंधू लागोपाठ दोन ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकणारी पहिली भारतीय महिला तसंच दुसरी भारतीय खेळाडू ठरली आहे. याआधी सुशील कुमारने बीजिंग ऑलिम्पिकमध्ये 2008 साली ब्रॉन्झ मेडल आणि लंडन ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर मेडल जिंकलं होतं. सिंधूने याआधी रियो ऑलिम्पिकमध्ये 2016 साली सिल्व्हर मेडल जिंकलं होतं.
याआधी शनिवारी झालेल्या सामन्यामध्ये सिंधूचा चीनच्या ताई झू यिंगने सिंधूचा 18-21,12 – 21 असा पराभव केला, त्यामुळे तिचं गोल्ड मेडल जिंकण्याचं स्वप्न भंगलं. ब्रॉन्झ मेडलसाठीच्या या सामन्यात सिंधूने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. पहिल्या गेममध्ये तिने 11-8 ने आघाडी घेतली. यानंतर ही आघाडी 16-10, 19-12 पर्यंत वाढवली आणि पहिला गेम 21-13 ने जिंकला. दुसऱ्या गेममध्येही तिने चांगली सुरुवात केली आणि अवघ्या काही वेळात 5-2 ने आघाडी घेतली. बिंग जियाओ पहिला सेट हरल्यानंतर दबावात आली, त्यामुळे तिचे शॉट बााहेर गेले, पण तिने पुनरागमन करत स्कोअर 6-8 केला. सिंधूने कमी चुका करत स्कोअर पुन्हा 11-8 वर नेला, पण बिंगने 11-11 ने सेट बरोबरीत आणला. यानंतर सिंधूने 16-13 आणि 21-15 ने गेम जिंकून ब्रॉन्झ पदकावर कब्जा केला.