Uncategorized

रूग्णांच्या सेवेसाठी आरोग्य यंत्रणा सक्षम करा, एका रेमडीसीवरसाठी 20-20 हजार लागतातच कसे? ढेपाळलेल्या यंत्रणेतील उणिवा खा. प्रीतमताईंनी जिल्हाधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिल्या, भाजपतर्फे जिल्हा प्रशासनाकडे एक हजार पीपीई किट देवून ताईंनी पुन्हा एखदा दातृत्व सिध्द करून दाखविले


बीड, दि. 18 (लोकाशा न्यूज) : कोरोनाच्या संकटात खा. प्रीतमताई नेहमीच बीड जिल्हावासियांच्या मदतीला धावून आलेल्या आहेत. मागील चार दिवस त्यांनी बीड जिल्ह्यातील प्रत्येक कोविड वार्डात जावून रूग्णांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या, तसेच कोविड सेंटरमध्ये दिल्या जाणार्‍या सुविधा दर्जेदार आहेत की नाही यावरही त्यांनी स्वत:चे लक्ष केंद्रीत केले, तर रविवारी दुपारी त्यांनी जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांची भेट घेवून त्यांना बर्‍याच महत्वाच्या सुचना केल्या, एका रेमडीसीवरसाठी सर्व सामान्य रूग्णांना 20-20 हजार रूपये मोजावे लागत आहेत. रेमडेसिवीरमधील हा काळाबाजार थांबवा, यात कृत्रिम टंचाई होणार नाही याची काळजी घ्या, असे सांगत त्यांनी जिल्ह्यातील ढेपाळलेल्या यंत्रणेतील अनेक उणिवा जिल्हाधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिल्या, विशेष म्हणजे भाजपच्या वतीने त्यांनी जिल्हा आरोग्य यंत्रणेला तब्बल एक हजार पीपीई कीट यावेळी उपलब्ध करून दिल्या, आरोग्य यंत्रणेला ही मदत केल्याने पुन्हा एखदा खा. प्रीतमताईंमधील दातृत्व दिसून आले आहे.
राज्यासह बीड जिल्ह्यात सध्या कोरोनाचे संसर्ग वाढला आहे. जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी विशेष उपाययोजना करत आहेत. परंतु कोरोनाची साखळी तुटता तुटत नाही. वाढती कोरोना रुग्ण संख्येपुढे वैद्यकीय सुविधांची टंचाई निर्माण झाली आहे. वैद्यकीय उपकरणे व साहित्य यांच्या टंचाईमुळे आरोग्य विभाग हतबल झालेला दिसतो. कोरोना योद्ध्यांना साहित्याचा पुरवठा व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सामाजिक संघटना राजकीय पक्ष सेवाभावी वृत्तीतून काम करणार्‍या संस्था व व्यक्तींनी या महामारीला रोखण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन बीड जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या पुढाकारातून 1 हजार पीपीई किट रविवारी खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी बीड यांच्याकडे सुपूर्त करण्यात आल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, भगीरथदादा बियाणी, विक्रांत हजारी, प्रा.देविदास नागरगोजे, सलीम जहांगीर, स्वप्नील गलधर, अजय सवाई, डॉ.लक्ष्मण जाधव, अनिल चांदणे, संग्राम बांगर, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संतोष सोहनी, प्रमोद निणाळ, पिंगळे, बद्रीनाथ जटाळ, अमोल वडतिले, संदीप उबाळे, दीपक थोरात आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना खा.डॉ.प्रितमताई म्हणाल्या कि कोव्हीडच्या महामारीत भारतीय जनता पार्टीने सातत्याने सर्वसामान्य माणसांना मदत करण्याची भूमिका निभावली आहे व आजही भाजपाचे कार्यकर्ते मदतीसाठी कार्यरत आहेत. मागील लॉकडाऊनच्या काळात जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या पुढाकारातून व मार्गदर्शनाखाली अतिशय उत्कृष्ट सेवाकार्य करण्यात आले. अन्नदान, धान्य व किराणा साहित्य वाटप, आरोग्य शिबीर यांसारखे सामाजिक उपक्रम राबवून थेट सामान्य माणसांना मदत करण्याचे काम केले गेले. आज त्यांच्याच वतीने 1 हजार पीपीई कीट आरोग्य विभागाला देण्याचे काम होत आहे. आजपर्यंत सर्वच स्तरातून कोरोना महामारी रोखण्याचे काम होत आहे. याकामी जिल्ह्यातील सामजिक भान व जान असणार्‍या लोकांचे योगदान फार मोठे आहे. मी गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील कोव्हीड सेंटरला भेटी दिल्या या भेटीदरम्यान आरोग्य सुविधांमध्ये ज्या त्रुटी आढळून आल्या त्या प्रत्येक ठिकाणी सुधारण्याच्या सूचना दिल्या. काही कोव्हीड सेंटरमध्ये अतिशय गलथान कारभार असल्याचे चित्र समोर दिसून आले. या संदर्भात सर्व माहिती जिल्हाधिकार्‍यांना देऊन तात्काळ उपाययोजना करण्याबाबत मागणी करणार आहे. चुकीचे काम करणार्‍यांवर कडक कारवाईचा आग्रह धरणार आहे. विशेषतः रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार जिल्ह्यातही चालू आहे. यामुळे कोरोना रुग्णांचे प्रचंड हाल व आर्थिक लुट चालू आहे. रेमडेसिवीर कृत्रिम टंचाई निर्माण करू नये यासाठी जिल्हाधिकारी व आरोग्य प्रशासनाने सतर्क राहावे असे आवाहन त्यांनी केले आहे. संपूर्ण जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतर रविवारी दुपारी ताईंनी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांची भेट घेतली. मागील चार दिवसांच्या पाहणीमध्ये माझ्या निदर्शनास आलेल्या त्रुटी आणि रुग्णांच्या समस्या संदर्भात विविध सूचनांचे पत्र जिल्हाधिकार्‍यांना दिले. तसेच कोरोनाचा सामना करण्यासाठी जिल्हा पातळीवर विशेष नियोजन करण्याच्या सूचनाही केल्या. तत्पूर्वी जिल्हा भाजपच्या वतीने आरोग्य यंत्रणेसाठी एक हजार पीपीई किट देण्यात आल्या.रुग्णांची अहोरात्र सुश्रुती करणार्‍या कोविड योद्धयांसाठी सामाजिक जाणिवेतून दिलेल्या पीपीई किटचे हस्तांतरण करताना समाधान वाटले. विशेष म्हणजे कोरोनाची साखळी रोखण्यासाठी कडक निर्बंध करण्याच्या सुचनाही यावेळी त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना केल्या.

जनहिताच्या कामात आम्ही कधीच
कमी पडणार नाहीत

सत्ता असताना पंकजाताईंनी जिल्ह्याची झोळी फाटेपर्यंत निधी आणला,
जिल्ह्यातील महत्वाचे प्रश्‍न मार्गी लावले, सामाजिक सेवेतही आम्ही कधीच मागे राहिलो नाहीत, ज्याप्रमाणे सत्ता असताना जिल्ह्यातील जन हिताचे काम केले आगदी त्याच पध्दतीने आताही आम्ही दोघी जनहिताचेच काम करीत आहोत, त्यात आम्ही कधीच कमी पडणार नाहीत, असा विश्‍वास यावेळी खा. प्रीतमताईंनी बोलून दाखविला आहे.

मृत्यूच्या वाढत्या प्रमाणावर
आत्मपरिक्षण करावे

जिल्ह्यात सध्या कोरोनाची खुपच गंभीर परिस्थिती आहे, रूग्ण संख्येबरोबरच मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी पालकमंत्री कमी पडत आहेत का? असा प्रश्‍न माध्यमांनी खा. प्रीतमताईंना विचारला, मृत्यूचे प्रमाण का वाढते यासंदर्भात पालकमंत्र्यांनी अभ्यास करावा, त्यांनी आत्मपरिक्षण करावे, असे खा. प्रीतमताईंनी म्हटले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!