बीड

टुलकिटचे कनेक्शन बीडपर्यंत, शंतनू मुळूकच्या घराची दिल्ली पोलिसांकडून झडती


बीड, दि. 15 (लोकाशा न्यूज) : नवी दिल्ली येथे शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसक आंदोलनाशी संबंध असलेल्या टूलकिट प्रकरणाचे बीड कनेक्शन समोर आले आहे. या प्रकरणातील संशयित शंतनू शिवलाल मुळूक याच्या चाणक्यपुरीतील घराची नुकतीच दिल्ली पोलिसांनी झडती घेत त्याच्या नातेवाईकांची चौकशी केली. पोलिस अधीक्षक राजा रामास्वामी यांनीही याला दुजोरा दिला.
नवीन केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान प्रजासत्ताक दिनी नवी दिल्लीत हिंसक प्रकार घडला. आंदोलनादरम्यान टूलकिटचे प्रकरण समोर आले असून यामध्ये शहरातील शंतनु शिवलाल मुळूक या तरुणावरही गुन्हा नोंद झाला आहे. त्याच्या चौकशीसाठी दिल्ली पोलिसांचे पथक नुकतेच बीडमध्ये येऊन गेले. पोलिस निरीक्षक सज्जनसिंग यांचे पथक पहाटेच शंतनु मुळूकच्या घरी पोचले. त्यांनी वडील माजी नगराध्यक्ष शिवलाल मुळूक व आई हेमलता मुळूक यांची चौकशी करुन त्याची पार्श्वभूमी जाणून घेतली. तसेच त्याचा अलीकडे आलेल्या संपर्काचीही माहिती घेतली. तसेच वडिलांना घेऊन पथक औरंगाबादलाही गेले. बँकेत जाऊन त्याच्या बँक खात्याचा तपशीलही दिल्ली पोलिसांनी घेतला. दरम्यान, दिल्ली पोलिस आल्याचे आणि त्यांची चौकशी करुन गेल्याचे पोलिस अधीक्षक राजा रामास्वामी यांनी सांगितले. तर, शंतनू हा पर्यावरणप्रेमी असल्याचे सांगत त्याने आंदोलनाला पाठिंबा दिला म्हणून गुन्हा नोंद करुन त्याची नाहक बदनामी केली जात असल्याचा आरोप शिवलाल मुळूक यांनी केला. पोलिस आल्याचे सांगून त्यांना तपासात सहकार्य केल्याचे श्री.मुळूक म्हणाले. शंतनू हा बीई’ मॅकेनिक आहे. तसेच त्याने अमेरिकेत एमएस ची पदवी घेतली असून तो पर्यावरण संवर्धना संदर्भात राष्ट्रीय पातळीवर काम करतो. शेतकर्‍यांच्या संदर्भात तळमळ असून शेतकरी आंदोलनाला शोषल मीडियाच्या माध्यमातून तो पाठींबा देत होता. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला मीही शेतकर्‍याची मुलगी म्हणून पाठींबा दिल्याचे आई हेमलता मुळूक म्हणाल्या. दरम्यान, आठ दिवसांपूर्वी कुटूंबियांत झालेल्या एक लग्न सोहळ्यासाठी शंतनु बीडला आला होता. तेव्हाच त्याची आई – वडिलांशी भेट झाली. त्यानंतर त्याच्याशी संपर्क नसल्याचे दोघांनी सांगितले. सुरुवातीला औरंगाबादमध्ये नोकरी करणारा शंतनू अलीकडे पुण्याला काही तरी नवीन करण्यासाठी गेलेला आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!