बीड.दि.२८—–नगर-बीड-परळी रेल्वे मार्गासाठी केंद्र सरकारने तीनशे अठ्ठेचाळीस कोटींपैकी दीडशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी खा.प्रितमताई मुंडे यांचे आभार मानले आहेत.या रेल्वे मार्गासंदर्भात ऑगस्ट महिन्यात झालेल्या ऑनलाइन बैठकीत निधी मिळवून देण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्याची मागणी रेल्वे विभागाने त्यांच्याकडे केली होती,यासंदर्भात रेल्वे मंत्रालयाकडे प्रितमताई मुंडे यांनी पाठपुरावा केला होता,त्यांच्या पाठपुराव्यानंतर तीनशे अठ्ठेचाळीस कोटींपैकी दीडशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याने प्रकल्पाला गती मिळणार आहे.
बीड जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असलेला नगर-बीड-परळी रेल्वे मार्ग वेळेत पूर्ण करण्यासाठी खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात रेल्वे आणि जिल्हा प्रशासनाची संयुक्त बैठक घेतली.रेल्वे मार्गाच्या कामात येणाऱ्या अडचणी तात्काळ सोडवून प्रकल्पाच्या कामाला गती देण्याचे आदेश त्यांनी दोन्ही विभागांना दिले आहेत.तसेच भूसंपादनाचा विषय मार्गी लावण्यासाठी रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून त्यांनी आढावा घेतला. भूसंपादन,तसेच मार्गात येणारे विजेच्या खांब आणि झाडांचा अडथळा दूर करण्यावर देखील त्यांनी चर्चा केली.
दरम्यान भूसंपादनामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी रेल्वे विभागाने त्या त्या क्षेत्रात कॅम्प घ्यावा व भूसंपादनाशी संबंधित असलेल्या शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांचे प्रश्न मार्गी लावावेत अशा सूचना खा.प्रितमताई मुंडे यांनी रेल्वे विभागाला दिल्या.तसेच भूसंपादन आणि प्रकल्पातील इतर अडचणी सोडविण्यासाठी केलेल्या कार्यवाहीचा व दर महिन्याला होणाऱ्या कामाचा आढावा आपल्याला सादर करावा अशा सक्त सूचना देखील त्यांनी संबंधितांना अधिकाऱ्यांना केल्या.बीडकरांसाठी जिव्हाळ्याचा विषय असलेल्या रेल्वे मार्गासंदर्भात खा.प्रितमताई मुंडे यांनी जिल्हा प्रशासन आणि रेल्वे विभागाची संयुक्त बैठक घेतल्यामुळे रेल्वे प्रकल्पाच्या कामाला गती मिळेल असा विश्वास बीड जिल्ह्यातील नागरिकांमधून व्यक्त केला जातो आहे.
••••