अंबाजोगाई, दि. 9 (लोकाशा न्यूज) : लातूर जिल्ह्यातील रेणापूर ते लोखंडी सावरगाव टी-पॉईंट 548 ब राष्ट्रीय महामार्गाचे काम पुर्ण होण्याअगोदरच सेलु अंबा येथील टोल वसुली रजाकारी पद्धतीने वसुली होऊ लागली. याचा प्रत्यय खुद्द आ. नमिता अक्षय मुंदडा यांनाच आल्यानंतर राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालकासह कार्यकारी अभियंत्यासह एमएसआरडीसीच्या अधिकार्यांच्या अंबाजोगाईतील शासकीय विश्रामगृहावर झालेल्या बैठकीत त्यांनी खडे बोल सुनावले. त्या बैठकीदरम्यान रस्त्याच्या कंत्राटदारासह अधिकार्यांची बोलती बंद झाली.
रेणापुर ते लोखंडी सावरगाव टी-पॉईंट हा 548 ब राष्ट्रीय महामार्ग असून या रस्त्यावरील अंबासहकारी साखर कारखाना चौकातील 1.2 किलोमीटर उड्डाणपुल मावेजामुळे रखडलेला आहे. या उड्डाणपुलात जागा गेलेल्या शेतकर्यांसह स्थानिकांना अकृषी व नगररचनाकार यांच्या मान्यता असलेल्या शेतकर्यांनाच भरिव मदत मिळणार होती. परंतु आवॉर्ड प्रमाणे मावेजा देण्यात यावा. असे केंद्र शासनाचे निर्देश आल्यानंतर या उड्डाणपुलात गेलेल्या सर्वच लाभधारकांना केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणेच मावेजा मिळणार आहे. मावेजा मिळेपर्यंत स्थानिकांनी या उड्डाणपुलाचे काम थांबवले असले तरी तात्पुरत्या स्वरूपात पुला लगत असलेल्या रस्त्याचे डांबरीकरण करून देण्याचे यावेळी अधिकार्यांनी कबुल केले. अंबा कारखाना ते मोरेवाडी चौकातील हॉटेल लोकसेवा जवळ दोन्ही दुतर्फा बाजूनी रस्त्याची जंपींग वाढली आहे. त्यामुळे दररोज अपघात होवू लागले आहेत. ही जंपींग काढून त्याची लेव्हल करून देण्याचे मान्य केले. गेल्या आठवड्यातच जोगाईवाडी जंक्शनवर एका पादचार्याचा अपघात होवून शरीराचेे दोन भाग वेगवेगळे झाले होते. या अपघात प्रवण ठिकाणी पट्टे मारून दिशादर्शक फलक लावण्याची मागणी केली. ज्याही भागामध्ये राष्ट्रीय महामार्गाचा टोलनाका सुरू होतो त्या टोलनाक्याच्या परीघातील वीस किलोमीटर अंतरातील वाहनधारकांना मासिक पास देवून टोलमध्ये सवलत देण्याचा राष्ट्रीय महामार्गाचा नियम आहे. परंतु संबंधित कंत्राटदाराने टोलनाका सुरू करण्याअगोदर कुठलीही जाहिरातबाजी व भोंगा फिरवून या वीस किलोमीटरच्या अंतरातील गावांना कल्पना न देताच मागील तेरा दिवसापासुन टोलनाका धारक लूट करत आहेत. यावरही आ. मुंदडा यांनी अधिकार्यांना धारेवर धरत स्थानिकांना मासीक पास मिळवून देण्यासाठी टोलनाक्यावर दोन्ही दुतर्फा बाजूंनी चार कांउटर उघडण्याची सूचना केली. ही सूचना लागलीच मान्य करून उद्यापासुन वीस किलोमीटर अंतरातील प्रत्येक गावात एजन्सी धारक लाउड स्पिकर फिरवून वाहनांना टोलमधून सवलत मिळविण्यासाठी जागृती व्हावी या उद्देशाने प्रयत्न केले जाणार आहेत. अंबाजोगाईच्या शासकीय विश्रामगृहावर झालेल्या बैठकीस केजच्या आ.नमिताताई मुंदडा, ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, अक्षय मुंदडा, प्रकल्प संचालक एस.व्ही.पाटील, शाखा अभियंता आर.ए.गायकवाड, टीमलिडर एस.के.नवटाके, कंत्राटदार सुरेंद्रकुमार शुल्का, रेणापूर ते लोखंडी महामार्गाचे काम करणार्या कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर, कानसिंन जी.आर, अॅड.संतोष लोमटे यांच्यासह पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते.
स्थानिकांना 50 फेर्यांची होती सवलत
टोलनाक्याच्या 20 किलोमीटर अंतरातील पासधारक वाहन धारकांना 50 फेर्यांची महिनाभरासाठी प्रवासाची तरतुद होती. मात्र आमदारांच्या आग्रहास्तव स्थानिक वाहन धारकांना महिनाभरासाठी अमर्यादीत फेर्यांची सवलत दिल्यामुळे स्थानिक वाहन धारकांनी समाधान व्यक्त केले आहे.
मावेजा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार – आ.मुंदडा
अंबाकारखाना चौकातील उड्डाणपुलामध्ये जमिनी गेलेल्या शेतकर्यांना लवकरात लवकर मावेजा मिळविण्यासाठी केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाटपुरावा करून थकलेल्या मावेजासाठी प्रयत्न करणार असून त्या शेतकर्यांना न्याय मिळाल्यानंतर लवकरच उड्डाणपुल तयार करून वाहनधारकांना आपली वाहतुक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आ. नमिताताई मुंदडा यांनी यावेळी म्हटले.
असे असतील मासिक पासचे दर
खाजगी चार चाकी वाहने – 275 रूपये
व्यावसायिक चार/तीन चाकी प्रवासी वाहने – 900 रूपये
(यापूर्वी 1,250 रूपये)
लहान माल वाहतूक वाहने, मिनी बस – 1,000 रूपये (यापूर्वी रूपये 2,015)