उस्मानाबाद, दि. 9 ऑक्टोबर : संयम कधी सोडायचा माहित आहे, पण गरज पडेल तेव्हा तलवारी काढू, असा इशारा भाजपचे राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे. आम्ही भीक नाही तर हक्क मागत आहोत. आम्हाला आता गृहित धरु नका आणि कायदा हातात घेण्याची वेळ आमच्यावर आणू नका, असंही संभाजीराजे म्हणाले. तसंच येत्या 15 तारखेला अशोक चव्हाण यांच्या घरासमोर आंदोलन करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी सरकारला जागे करण्यासाठी आजपासून मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या तिसर्या पर्वाला तुळजापुरातून सुरुवात झाली. या आंदोलनाला संभाजीराजेंनी हजेरी लावली, त्यावेळी ते बोलत होते. 1902 मध्ये शाहू महाराजांनी प्रथम आरक्षण दिले त्यात मराठा समाजाचा सुद्धा समावेश होता. शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांची स्वराज्याची संकल्पना पुन्हा एकदा प्रस्थापित होणे गरजेचं आहे. 80 टक्के मराठा समाज गरीब आहे. आम्ही भीक मागत नाही हक्काचे आरक्षण मागतो. आम्हाला आता गृहित धरु नका आणि कायदा हातात घेण्याची वेळ आमच्यावर आणू नका. माझ्या रक्तात शिवाजी आणि शाहू महाराज आहेत. शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार, असं संभाजीराजे म्हणाले. मराठा आरक्षणासाठी सरकारकडून फार प्रयत्न होताना दिसत नाहीत. सरकारमध्ये समन्वय नाही, असंही ते म्हणाले. तसंच राज्यातली आंदोलने भाजपा पुरस्कृत नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. मराठा आणि ओबीसी समाजात जाणीवपूर्वक दुही निर्माण केली जात आहे. परंतु मराठा समाजात 2 गट पाडणार्याचे प्रयत्न हाणून पाडा, असं आवाहन संभाजीराजेंनी केलं. तसंच मराठा समाजाला ओबीसी समाजाच्या आरक्षणातून आरक्षण नको, असंही संभाजीराजे यांनी स्पष्ट केलं.
सारथी संस्था टिकू नये म्हणून
सरकारमधील काहींचे प्रयत्न
यावेळी सारथी संस्थेवरुनही त्यांनी सरकारवर निशाणा साधला. सारथी संस्था टिकू नये यासाठी सरकारमधले घटक प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसंच अजित पवार असूनही सारथी संस्था सुरु झाली नाही, असंही म्हणाले.
एमपीएससी परीक्षांना विरोध फक्त कोरोनामुळे : संभाजीराजे
राज्यात सध्या एमपीएससी परीक्षांना काही मराठा संघटना तसंच काही परीक्षार्थ्यांकडून विरोध होत आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागल्याशिवाय लोकसेवा आयोगाची परीक्षा घेऊ नये, अशी त्यांची भूमिका आहे. तर दुसरीकडे दलित संघटनांसह इतरांनी परीक्षेसाठी आग्रह धरला आहे. परंतु लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला विरोध केवळ कोरोनामुळे करत असल्याचं संभाजीराजेंनी म्हटलं. कोरोना कमी झाल्यावर परीक्षा घ्यावी, असंही त्यांनी सांगितलं. मात्र आधीच्या नियुक्त्या का दिल्या नाहीत, असा प्रश्नही त्यांनी विचारला.