अंबाजोगाई : महिला पोलीस कर्मचारी असलेल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पोलीस पतीसह त्याच्या कुटूंबियांनी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. त्यानंतर रविवारी (दि.२७) सायंकाळी तिला जबरदस्तीने विषारी औषध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पतीसह दहा जणांवर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. पोलीस कर्मचारी असणारे हे दाम्पत्य सध्या अंबाजोगाई उपविभागांतर्गत एकाच ठाण्यात कर्तव्यावर आहे. दोन वर्षापूर्वी त्यांचा विवाह झाला होता. २८ वर्षीय पिडीत विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार लग्नानंतर सुरूवातीचे काही दिवस चांगले गेल्यानंतर पतीने तिच्या चारित्र्यावर संशय घेत तिला मारहाण सुरू केली. पतीच्या सांगण्यावरून सासू-सासरा, दिर, जाऊ आणि इतर नातेवाईकांनी देखील तिला शिवीगाळ करून मारहाण करत असत. याबाबत पिडीतेने पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला तक्रार निवारण केंद्रातही धाव घेतली. त्यानंतर सासरच्या मंडळींनी आता कोणत्याही परिस्थितीत तुला नांदवणार नसून तिच्या पतीचे दुसरे लग्न लावून देणार असल्याचे सांगत घटस्फोट देण्यासाठी त्रास देऊ लागले. दरम्यान, पिडीतेची बदली झाल्यामुळे ती अंबाजोगाईतील रायगड नगर भागात किरायाने राहू लागली. रविवारी सकाळी पिडीतेकडून सासूच्या मोबाईलवर चुकून काॅल लागला. तू काॅल का केलास याचे भांडवल करत तिचा पती, सासू-सासरा, दिर, नणंद, सवत, भावजय व इतर नातेवाईक दुपारी ४ वाजताच्या सुमारास स्काॅर्पिओ (एमएच ४४ जी २३६६) आणि दुचाकीवरून पिडीतेच्या रायगड नगर येथील घरी आले. आम्ही तुला सवत आणली आहे, आता तुला नांदवणारही नाहीत आणि जीवंतही ठेवणार नाहीत असे म्हणत त्या दहा जणांनी संगनमत करून पिडीतेला जबरदस्तीने विषारी औषध पाजले असे तिने तक्रारीत नमूद केले आहे. सध्या पिडीतेवर अंबाजोगाई येथील स्वाराती रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तिच्या फिर्यादीवरून पतीसह दहा आरोपींवर अंबाजोगाई शहर ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास सहा. पोलीस निरिक्षक दहिफळे करत आहेत.