परळी दि. ०७ —– पावसाने हुलकावणी दिल्यामुळे परळी तालुक्यातील खरीपाच्या पिकासह ऊसाचे पीकही संकटात सापडल्याने शेतकरी हवालदिल झाला असून पिकांना जीवदान देण्यासाठी वाण धरणाचे पाणी तात्काळ सोडावे अशी मागणी पंकजाताई मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या वतीने केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी त्वरेने कार्यवाही करावी असे निवेदनही त्यांनी दिले आहे.
बीड जिल्हयात यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने बहुतांश धरणे भरली आहेत. माजलगाव धरण ८० टक्के, कुंडलिका शंभर टक्के तर परळीला पाणी देणारे वाण धरणही ७० टक्के भरले आहे. जिल्हयात पावसाची स्थिती चांगली असली तरी परळी तालुक्यात मात्र म्हणावा तेवढा पाऊस झाला नाही त्यातच गेल्या पंधरा दिवसापासून पावसाने दडी मारल्यामुळे कापूस, सोयाबीन, तूर या पिकासह उसाचे पीक अडचणीत आले आहे. वाण धरणात पुरेसा साठा आहे, पाणी सोडले तरच पिके वाचणार आहेत, अन्यथा चांगला पाऊस काळ असून सुद्धा पिकांना धोका होऊ शकतो. वाणचे पाणी सोडल्यास त्याचा फायदा मोठ्या प्रमाणात तालुक्यातील शेतकऱ्यांना होईल, ही गरज ओळखून वाणचे पाणी तात्काळ सोडण्याची कार्यवाही करावी आणि पिकांना पर्यायाने चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी पंकजाताई मुंडे यांनी केली आहे.
••••