दिल्ली, दि.3 (लोकाशा न्युज) ः आंध्रप्रदेश सरकारने ऑनलाइन गेम्स रमी आणि पोकरवर बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे. या गेम्सच्या माध्यमातून तरुण चुकीच्या मार्गावर भरकटत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं वृत्त पीटीआयने दिलं आहे. मुख्यमंत्री वाय एस जगन मोहन रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत ऑनलाइन जुगारावर बंदी आणण्याचा निर्णय घेण्यात आला असं माहितीमंत्री वैकटरमय्या यांनी दिली आहे.बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितलं की, “ऑनलाइन जुगाराने तरुणांना आपल्या जाळ्यात अडकवलं आहे. दिशाभूल करुन तरुणांचं नुकसान केलं जात होतं. यामुळेच आम्ही तरुणांचं रक्षण करण्याच्या हेतूने अशा पद्धतीच्या सर्व ऑनलाइन गेम्सवर बंदी आणण्याचा निर्णय घेतला”.