बीड । दि. ०८ ।
पुरुषप्रधान संस्कृतीमुळे महिलांमध्ये सातत्याने दुय्यम दर्जाची भावना निर्माण होते, जोपर्यंत महिला एकमेकींना मदत करण्याची भावना बाळगणार नाहीत तोपर्यंत समाजातील आणि आपल्या मनातील या मानसिकतेत बदल होणार नाही. जर समाजात बदल करायचा असेल आणि चांगले पोषक वातावरण निर्माण करावयाचे असेल तर महिलांना सर्वच क्षेत्रांमध्ये समानता मिळणे आवश्यक आहे अशी भावना खा.प्रितमताई मुंडे यांनी व्यक्त केली.
बीड जिल्हा पोलिस दलाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त बीड शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात “ स्त्री शक्ती मंथन” कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कतृत्वान यशस्विनी महिलांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी मंचावर खा.प्रितमताई मुंडे यांच्यासह जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, जिल्हा पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, जिल्हा शल्य चिकित्सक सुरेश साबळे, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, सचिन पांडकर, नगर परिषदेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे उपस्थित होते.
यावेळी उपस्थित महिलांशी संवाद साधताना खा.प्रितमताई मुंडे म्हणाल्या की “महिलांनी त्यांच्या महिला असल्याचा अभिमान बाळगावा, आपण जेंव्हा आपल्यासह ईतर महिलांचा सन्मान करू तेंव्हा त्यांनाही स्वतःच्या पायावर उभे राहण्यास प्रेरणा मिळेल. आज घडीला अनेक क्षेत्रांमध्ये महिला काम करत आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असताना त्यांना कुटुंबाची साथ आणि समर्थन मिळाले तर त्या देखील निश्चितपणे उल्लेखनीय कामे करतील. आपला जिल्हा हा महिलांना साथ देणारा पुरोगामी विचारांचा आणि महिलांचे नेतृत्व जपणारा जिल्हा आहे, लोकसभेच्या पंधरा पैकी सहा वेळा जिल्ह्याने महिला खासदारांना संधी दिली असल्याचे सांगून या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमासाठी जिल्हा पोलिस दलाचे खा.प्रितमताई मुंडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता धसे यांनी तर आभार प्रदर्शन पोलिस निरीक्षक सुरेखा धस यांनी केले.
••••