लसीकरण
बीड, दि. 14 (लोकाशा न्यूज) : गोवर या आजारातून मृत्यू होवू नये, यासाठी जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग पावलोपावली काळजी घेत आहे. या अनुषंगानेच आता 15 जानेवारी ते 25 जानेवारीच्या सत्रात जवळपास 2600 बालकांचे लसीकरण केले जाणार आहे. या कामावर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गित्ते आणि डॉ. संजय कदम हे बारीक लक्ष ठेवून आहेत.
मुंबई आणि मालेगाव याठिकाणी गोवर आजाराने बालकांचा मृत्यू झाला होता. या अनुषंगानेच संपूर्ण महाराष्ट्रातील आरोग्य विभाग दक्ष झालेला असून हे संकट आपल्या जिल्ह्यावर येवू नये यासाठी बीड झेडपीचा आरोग्य विभाग सरसावला आहे. त्यानुसार 9 महिण्यांनंतरच्या बालकांना पहिला तर 16 महिण्यांनंतरच्या बालकांना गोवरचा दुसरा डोस देण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील 3761 बालकांना डोस देण्यात आला होता आता 15 ते 25 जानेवारीदरम्यान लसीकरणाचे दुसरे सत्र हाती घेण्यात आले आहे. या सत्रात 1029 बालकांना पहिला तर 1555 बालकांना दुसरा डोस दिला जाणार आहे. या सर्व प्रक्रियेवर स्वत: जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गित्ते आणि डॉ. संजय कदम हे बारकाईने लक्ष ठेवून आहेत.