
परळी ।दिनांक ०५।
गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान व द टर्निंग पाॅईंटच्या वतीने शहरात आयोजित करण्यात आलेल्या गौरी-गणपती स्पर्धा महोत्सवात व्यसनमुक्ती, स्वच्छता अभियान, स्ञी-भ्रुण हत्या, गोपीनाथ गड, पाणी वाचवा, वृक्ष संवर्धन आदी ज्वलंत विषयाशी संबंधित सामाजिक जनजागृती करणारे देखावे सादर करून स्पर्धकांनी पाहणाऱ्यांची मनं जिंकली. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे आणि खा. डाॅ. प्रितमताई मुंडे यांनी भर पावसात घरोघरी जाऊन देखाव्याची पाहणी केली. ठिक ठिकाणी त्यांचे औक्षण करून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले, त्यांच्या भेटीन महिलांमध्ये मोठा उत्साह संचारला होता.
गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान तर्फे शहरात नेहमीच वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविले जातात. शहरातील सांस्कृतिक चळवळ वृद्धिंगत करणारी गौरी-गणपती स्पर्धा ही शहरातील हौशी गृहिणींसह आबालवृद्धांना सदैव प्रोत्साहीत करत असल्याने सामान्य नागरिकांना ही स्पर्धा सुखावून टाकते. आपले कितीही महत्वाचे काम असले तरी सर्व काही बाजूला ठेवून आपल्या लाडक्या शहरवासीयांसाठी पंकजाताई मुंडे शहरात घरोघरी जाऊन हजारो स्पर्धकांचा उत्साह द्विगुणीत करत असतात. एक प्रकारे ही स्पर्धा सांस्कृतिक चळवळ म्हणूनच शहरात रूजली आहे.
भर पावसात मुंडे भगिनी घरोघरी
पंकजाताई मुंडे यांच्या संपर्क कार्यालयात सकाळी ८ वा. लगबग होती ती स्पर्धेचे परिक्षक आणि कार्यकर्त्यांची..स्पर्धेचे परिक्षण करण्याबरोबरच पंकजाताई मुंडे आणि खा. प्रितमताई मुंडे यांच्या घरोघरी भेटींची रूपरेषा ठरवण्यात आली. यंदा स्पर्धकांपेक्षा परीक्षकांचीच जास्त कसोटी होती कारण यावेळी दोन हजारांहून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. वेगवेगळ्या ४० टीम ज्यात दोन महिला आणि एक संयोजक असे तीन जण परीक्षक म्हणून घरोघरी गेले आणि बारकाईने शहरातील हजारो देखाव्यांची पहाणी करून गुणांकन केले. विशेष म्हणजे देखावे पाहण्यासाठी ना. पंकजाताई मुंडे आणि खा. प्रितमताई मुंडे यांनी दुपारनंतर भर पावसात स्वतः घरोघरी जाऊन स्पर्धकांना प्रोत्साहित केले. त्यांच्या भेटीमुळे महिलांमध्ये उत्सहाचे वातावरण निर्माण झाले होते.
देखाव्यातून सामाजिक जागृती
धनगर पार भागातील सुनिता बिरजू भंडारे व शालिनी कृष्णा भंडारे यांनी दोन महिन्यांपासून अथक परिश्रम घेऊन देशभक्तीपर देखावा, आळंदी ते पंढरपूर दिंडी, भारतमाता, वीर सैनिक, भ्रुण हत्या, लेक वाचवा असा उत्कृष्ट देखावा साकारला. बॅक काॅलनीत व्यंकटराव आदोडे यांनी भारताने विविध क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा, जलालपूर येथे भारतीय सैन्यातील जवानाने देशाच्या सीमेचे रक्षण करणारे वीर जवान, माणिकनगर, विद्यानगर, माधवबाग आदींसह विविध भागात व्यसनमुक्ती, स्वच्छता अभियान, वृक्ष संवर्धन, हर घर तिरंगा अभियान, केदारनाथ मंदिर, भारताच्या नकाशात बारा ज्योतिर्लिंग, गौरवशाली महिलांचा इतिहास आदी एकाहून एक सरस देखावे साकारले. स्थानिक कलाकार आणि महिलांचे कलागुण पाहून मुंडे भगिनी भारावून गेल्या.
•••















