अंबाजोगाई – बीड जिल्ह्यात सुरवातील चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन, मुग, उडीद, कापूस, पिके मोठ्या प्रमाणात घेतली व पिकेही जोमात आली होती. परंतु मागील २० ते २५ दिवसापासून पावसाचा खंड पडला असल्यामुळे सोयाबीन, मुग, उडीद, कापूस, या पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. पिके करपू लागले आहेत. त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने पाहणी करून पंचनामे करावेत अशी मागणी केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. दरम्यान, आ. मुंदडा आणि आ. लक्ष्मण पवार यांनी सोमवारी (दि.२९) जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी २५ टक्के पीकविमा अग्रिम रक्कम देण्याची मागणी केली.
शेंगा भरण्याच्या काळात सोयाबीन, मुग, उडीद, ही पिके पाण्याच्या ताणाला अतिशय संवेदनशील आहेत. नेमकी ही पिके फुल धरण्याच्या अवस्थेत असताना बीड जिल्ह्यात मागील २० ते २५ दिवसापासून पावसाचा खंड पडला आहे. यामुळे पाण्याचा ताण बसल्याने फुल गळती मोठ्या प्रमाणात झाली असून शेंगा कमी प्रमाणात भरल्या आहेत. ज्या शेंगा भरल्या आहेत त्यामध्ये दाण्याचा आकार कमी झाला असून दाणे कमी पोसले आहेत. यामुळे उत्पन्नात कमालीची घट होणार असून हंगामामध्ये प्रतिकूल परिस्थिती मध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या आधीच शंखी गोगलगाय व पिवळा मोझाक यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यात आता पावसाने दडी दिल्याने शेतकऱ्यांच्या नुकसानात भर घातली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी वरील सर्व बाबीचा विचार करून तातडीने पाहणी करून पंचनामे करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. बीड जिल्ह्यातील सोयाबीन, मुग, उडीद, कापूस, पिकांचे तातडीने पंचनामे करण्याबाबत आदेश देऊन विमा कंपनीला गांभीर्याने घेण्याबाबत आदेश अशी मागणी आ. नमिता मुंदडा यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा; २५ टक्के अग्रिम रक्कम देण्याची मागणी
दरम्यान, सोमवारी आ. मुंदडा आणि आ. पवार यांनी सदरील प्रश्नावर जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांची भेट घेऊन चर्चा केली. या बैठकीत जिल्हा कृषी अधीक्षक जेजुरकर आणि बजाज अलायन्झ पीकविमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी उपस्थित होते. खरीप हंगामातील उत्पन्नात ५० टक्के अधिक घट अपेक्षित असल्यास त्यावेळी २५ टक्के अग्रिम रक्कम देण्याची पिकविम्यात तरतूद आहे. त्यानुसार बीड जिल्ह्यातील मुग सोयाबीन, उडीद, कापूस या पिकास नुकसान भरपाई देण्यासाठी अधिसुचना निर्गमित करावी अशी मागणी दोन्ही आमदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. दरम्यान, यलो मोझाकमुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल तयार असून गोगलगायमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु असून लवकरच अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती कृषी अधीक्षक जेजुरकर यांनी दिली. या बैठकीस ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, भाजप केज तालुकाध्यक्ष भगवान केदार, शेख रहीम, दिलीप सांगळे, नूर पटेल, खलील मौलाना, ताहेरभाई, शरद इंगळे आदी उपस्थित होते.















