नवी दिल्ली : ओबीसी आरक्षणासंदर्भातली (OBC Reservation) प्रकरणात आजही सुनावणी पूर्ण झालेली नाही. उद्या (14 डिसेंबर) सकाळी 11 वाजता होणार पुढची सुनावणी आहे. केंद्र सरकारने डेटा उपलब्ध करून द्यावा याबाबत राज्य सरकारचा युक्तिवाद आहे. निवडणुकांबाबत ही आज युक्तिवाद झाला असून उरलेला युक्तिवाद आता उद्या होणार आहे.
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा अध्यादेश स्थगित केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारसह एकूण तीन हस्तक्षेप याचिकांवरील सुनावणी आज (मंगळवारी) होणार होती. ओबीसी आरक्षणाबाबत अन्य राज्यांचा नियम महाराष्ट्रालाही लागू करा, अन्यथा सर्वच निवडणुका पुढे ढकलून इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी मुदत द्या, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. तसंच केंद्र सरकारकडे उपलब्ध असलेला डेटा राज्याला उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली. निवडणूक आयोगाने राज्यातील 105 नगरपंचायतीमधील ओबीसी प्रभागातील निवडणुकीला स्थगिती दिली आहे. येत्या 21 डिसेंबरला यासाठी मतदान होणार आहे. फेब्रुवारीमध्ये 23 महापालिका, 25 जिल्हा परिषदा, 299 पंचायत समित्या, 285 नगर परिषदांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे.