Uncategorized

पीडीतेवर अत्याचार करणार्‍या गुन्हेगारांना सोडणार नाही, दर्जेदार तपास करून पीडितेला न्याय मिळवून देणार – एसपी राजा रामा स्वामी, अंबाजोगाईतील ‘त्या’ बलात्कार प्रकरणाचा तपास आता एएसपी कविता नेरकरांकडे, नेरकरांनी चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नियुक्त केली, पीडितेचा पुन्हा जबाब नोंदवला जाणार


बीड, दि. 13 (लोकाशा न्यूज) : अंबाजोगाईत एका अल्पवयीन मुलीची तक्रार आल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, याप्रकरणातील काही आरोपींना अटकही करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणातील काही गोष्टी उघडकीस येत आहेत, त्यामुळेच या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार असून यामध्ये जो कोणी दोषी असेल त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार असल्याचे पोलिस अधीक्षक राजा रामा स्वामी यांनी म्हटले आहे. त्याअनुषंगानेच त्यांनी या गुन्ह्याचा तपास अंबाजोगाईच्या अप्पर पोलिस अधीक्षक कविता नेरकर यांच्याकडे सोपविला आहे. एसपींकडून जबाबदारी येताच कविता नेरकर यांनीही चौकशीसाठी तीन कर्मचार्‍यांची समिती नियुक्ती केली आहे. या समितीमध्ये दोन महिला तर एका पुरूष कर्मचार्‍याचा समावेश असून पीडितेचा पुर्वणी जबाब नोंदविला जाणार आहे.
अंबाजोगाईतील एका अल्पवयीन मुलीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. ती 13 व्या वर्षाची असताना तिचा तिच्या वडीलांसह नातेवाईकांनी विवाह लावून दिला. त्यानंतर ती तिच्या पतीसोबत वास्तव्यास गेली, मात्र तिचे आणि तिच्या पतीचे न पटल्यामुळे ती पुन्हा आपल्या वडिलांकडे परत आली, परत आलेल्या लेकीला आधार देण्याऐवजी वडिलांनीच तिच्यावर अत्याचार करण्यास सुरूवात केली. त्यामुळे पुढे ती अंबाजोगाईत एकटीच वास्तव्य करू लागली, यादरम्यानच्या काळात तिला तिचे मित्र जेवनासाठी घेवून गेले, मात्र यावेळी त्यांनी तिच्यावर अत्याचार केले, विशेष म्हणजे यादरम्यानच्या काळात अंबाजोगाईतील एका लॉजवर पोलिसांनीही तिच्यावर अत्याचार केल्याचे तिचे म्हणणे आहे. तिच्या म्हणण्यानुसारच आतापर्यंत नऊ आरोपींवर अंबाजोगाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या प्रकरणातील एक एक गुढ आणखी बाहेर येत आहे. गेल्या सहा महिण्यात तिच्यावर जवळपास चारशे वेळा अत्याचार झाला असल्याचे समोर येत आहे. यासंदर्भात तिने बाल कल्याण समितीकडे आपला जबाब नोंदविला आहे.
यासंदर्भात बाल कल्याण समितीने पोलिस अधिक्षकांनाही माहिती दिली आहे. या समितीकडून माहिती प्राप्त होताच पोलिस अधीक्षक राजा रामा स्वामी यांनी पुन्हा या प्रकरणाकडे आपले लक्ष वेधले आहे. त्यानुसारच त्यांनी या प्रकरणाचा तपास अंबाजोगाईच्या अप्पर पोलिस अधीक्षक कविता नेरकर यांच्याकडे सोपविला आहे. त्यावर नेरकर यांनीही प्रकरणाच्या संपूर्ण चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नेमली आहे. त्यानुसार कविता नेरकर ह्या पीडितेचा पुर्वणी जबाब नोंदविणार आहेत. या प्रकरणात जो कोणी दोषी आहेत त्यांना सोडणार नाही, त्यांच्यावर कडक कारवाई करणार असल्याचे पोलिस अधीक्षक राजा रामा स्वामी यांनी म्हटले आहे. शनिवारी रात्री साडे सात वाजता त्यांनी यासंदर्भात एक स्वतंत्र पत्रकार परिषद घेवून सदर प्रकरणाविषयी माहिती दिली आहे.

पोलिस दोषी असतील तर
त्यांच्यावरही कारवाई होणार
अंबाजोगाईतील एका लॉजवर नेवून पोलिसांनी माझ्यावर अत्याचार केला, असा जबाब पीडितेने बाल कल्याण समितीकडे दिलेला आहे. तसेच माझी तक्रारही पोलिसांनी तात्काळ दाखल करून घेतली नाही, असे त्या पीडितेचे म्हणणे आहे. घडलेल्या या प्रकरणावरच पोलिस अधीक्षकांनी कठोर भुमिका घेतली आहे. सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी पोलिसांवरही कडक कारवाई केली जाईल, असा विश्‍वास याच पत्रकार परिषदेमध्ये पोलिस अधीक्षक राजा रामा स्वामी यांनी व्यक्त केला आहे.

पीडितेच्या वडिलालाही पोलिसांनी
ठोकल्या बेड्या
एक तर बालपणातच विवाह केला, पुढे पतीकडूनही चांगली वागणूक मिळाली नाही, त्यामुळे पतीला सोडून परत आल्यानंतर वडिलांनीही अत्याचार केले, पीडित मुलीच्या याच जबाबावरून पोलिसांनी तिच्या वडिलांनाही बेड्या ठोकल्या आहेत.

कविता नेरकरांनी पीडितेची घेतली भेट
सदर पीडितेवर घडलेल्या सर्व प्रकाराची माहिती आठ तारखेला पोलिसांसमोर आली, याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ नऊ जणांवर गुन्हा दाखल केला विशेष म्हणजे सदर पीडित गरोदर आहे, सध्या तिला बाल कल्याण समितीकडे सोपविण्यात आलेले आहे. मात्र तिची प्रकृती ठिक नसल्यामुळे तिला समितीने रूग्णालयात दाखल केले आहे. यादरम्यानच अप्पर पोलिस अधीक्षक कविता नेरकर यांनी त्या पीडितेची भेट घेवून तिच्याशी संवाद साधला आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!