अंबेजोगाई(प्रतिनिधी )-
अतिवृष्टीमुळे प्रचंड प्रमाणत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची पंचनामा करण्याबाबतची अट रद्द करून दीपावली पूर्वी सरसकट मदत करावी अशा मागणीचे निवेदन मुख्यमंत्री ठाकरे यांना केज मतदारसंघाच्या भाजपा आमदार नमिताताई मुंदडा यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे
गेल्या दोन महिन्यात राज्यात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे नदी, नाल्यात महापूर आला त्यामुळे शेतजमिनीचे व शेतातील पिकांचे सोयाबीन, ऊस, व खरीप हंगामातील सर्व पिकांचे (बागायती पिकांचे भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले. पिकांचे नुकसानच नाही तर अख्ख पिक वाहून गेले आहे. काही ठिकाणी जमिनी खरडून वाहून गेल्या, तसेच राज्यमार्ग, वस्ती रस्ते, शेती रस्ते, जिल्हा मार्ग, ग्रामीण रस्ते, पांदन रस्ते, व पुलांचे अत्यंत नुकसान झाले आहे. रस्ते व पुले नादुरुस्त झाले आहेत. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी दळणवळण वाहतूक बंद झाली गग्रामीण भागात बसेस बंद झाल्या वाहन जात नाहीत. अशी भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असताना शासनाकडून अत्यंत कमी मदतीचे आकड़े जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार गुरुवारी सदर मदतीचा शासन आदेश निघाला मात्र यात आधीच उध्वस्त झालेल्या शेतक-यांची शासनाकडून फसवणूक करण्यात आल्याचे दिसून येत आहे. सदर शासन आदेशामध्ये ज्या शेतकऱ्याचे पंचनामे झाले आहेत त्यांनाच मदत मिळेल असे नमूद केले आहे व पंचनामे करूनच लाभार्थ्यांची नावे निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे सदर अट ही आधीच त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याण्यासारखा प्रकार शासनाकडून करण्यात आलेला आहे.
बीड जिल्ह्यात केज, अंबाजोगाई तालुक्यात अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालेले आहे सदर नुकसानीचे बहुतांश भागात अद्याप पंचनामे झालेले नाहीत त्यामुळे बीड जिल्ह्यातील मोठ्याप्रमाणात शेतकरी मदतीपासून वंचित राहणार आहेत. तसेच सध्या खरीप हंगामातील सोयाबीन, उडीद, मुग पिकांचे काढणी झालेली आहे त्यामुळे पंचनामे कशाचे करणार? असाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सदर अट टाकून शासनाने शेतकऱ्यांची चेष्टा केल्याचे दिसून येत आहे, त्याच प्रमाणे गेल्या आठ दिवसापासून तलाठी/मंडळ अधिकारी यांचा संप चालू असल्यामुळे अनुदानाच्या याद्या प्रलंबित राहणार आहेत. त्यामुळे दीपावली पूर्वी मदतीपासून शेतकरी वंचित राहण्याची शक्यता नाकारता येणार नाही .
अतिवृष्टी, ढगफुटी मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आधीच खूप कमी प्रमाणता मदत जाहीर करण्यात आलेली आहे त्यामुळे पंचनाम्याची जाचक अट त्वरित रद्द करून शेतकऱ्यानां सरसगट मदत शेतकऱ्यांच्या खात्यात दीपावली पूर्वी जमा करण्याचे आदेश देऊन शेतकन्यांची दीपावली गोड करावी व नादुरुस्त रस्ते, पुलांची कामे त्वरित करण्यात यावीत अशीही मागणी केजच्या आमदार नमिताताई मुंदडा यांनी निवेदनात केली आहे















