Uncategorized

फोटो व्हायरल करण्याची धमकी देत बोलण्यासाठी जबरदस्ती; तरुणीची आत्महत्या, बाप-लेकावर अ‍ॅट्रॉसिटीसह गुन्हा दाखल


अंबाजोगाई / परळी, दि. 21 (लोकाशा न्यूज) : अंबाजोगाई तालुक्यातील 22 वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे फोटो काढले. त्यानंतर ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देत बोलणे चालू ठेवण्यासाठी जबरदस्ती केली. तिला घरी नेऊन पुन्हा हाकलून दिले. अखेर त्रासलेल्या त्या पिडीतेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना परळी तालुक्यातील आनंदवाडी शेतशिवारात 7 ऑक्टोबर रोजी घडली. या प्रकरणी प्रियकरासह त्याच्या वडिलांवर अ‍ॅट्रॉसिटीसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला.
पिडीतेच्या वडिलांच्या फिर्यादीनुसार, पतीच्या दारू पिण्याच्या सवयीमुळे त्यांची 22 वर्षीय मुलगी मागील तीन वर्षापासून माहेरच राहत होती. पाच महिन्यापूर्वी ती शिक्षणासाठी लातूरला गेली. तिथे पांडुरंग उद्धव नागरगोजे (रा. आनंदवाडी शिवार, ता. परळी) याच्यासोबत तिची ओळख झाली. आम्हा दोघात प्रेम असून लग्न करणार असल्याचे तिने एक महिन्यापूर्वी वडिलांना फोन करून सांगितले. त्यानंतर पांडुरंग मानसिक त्रास देऊ लागल्याने तिने त्याला बोलणे बंद केले. तेंव्हा पांडुरंगने तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत बोलण्यासाठी जबरदस्ती सुरु केली आणि तिला गावाकडे बोलावू लागला. त्यामुळे 6 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजता पीडिता पांडुरंगच्या गावात गेली. तिथून पांडुरंग तिला घेऊन घरी गेला असता त्याचे वडील उद्धव याने तू एका विशिष्ट जातीची मुलगी घरी का घेऊन आलास असा जाब विचारला आणि तिला हाकलून दे म्हणाले. तेंव्हा पांडुरंगनेही तिला हाकलून दिले. परंतु, त्यांना विनवण्या करून पीडिता तिथेच राहिली. त्यानंतर रात्रीतून तिने कुठलेतरी विषारी औषध प्राशन केले. दुसर्‍या दिवशी सकाळी पांडुरंगने तिला अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात दाखल केले. परंतु, तिथे उपचार सुरु असताना 8 ऑक्टोबर रोजी तिचा मृत्यू झाला. सदर फिर्यादीवरून पंदुर्नाग आणि उद्धव नागरगोजे या दोघांवर परळी ग्रामीण ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटीसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!