बीड, प्रतिनिधी :- लोकनेते गोपीनाथराव मुंडे हे वंचीत, उपेक्षीत माणसाचा आवाज होते. ते कोणा एका समाजाचे, जातीचे नव्हे तर आठरा पगड जाती- धर्माचे बहुजन नेते होते. सर्व जाती- धर्मातील वंचीत, उपेक्षीत माणसाला न्याय मिळवुन देण्यासाठी मुंडे साहेब लढले. असा नेता पुन्हा होणे नाही, असे प्रतिपादन भाजपाचे जेष्ठ नेते अॅड. सर्जेराव तांदळे यांनी केले. ते बोरफडी येथे चौकाच्या नामकरण कार्यक्रमात बोलत होते.
बीड तालुक्यातील बोरफडी येथे चौकाला लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे चौक असे नाव देण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून भाजप नेते अॅड. सर्जेराव तांदळे, शिवसेनेचे बप्पासाहेब घुगे, अॅड. राजेंद्र राऊत, नंदकुमार कदम, लालासाहेब घुगे, भुषण घुगे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना सर्जेराव तांदळे म्हणाले, लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब यांनी आठरा पगड जाती धर्मातील वंचीत- उपेक्षीत माणसाचे नेतृत्व केले. ऊसतोड कामगार, शेतकरी, मजूर अशा तळागाळातील माणसाची मान ताठ करण्यासाठी, त्याला समाजात मान- सन्मान मिळवुन देण्यासाठी मुंडे साहेबांनी आयुष्यभर संघर्ष केला. ते कुठल्या एका जातीचे नेते नव्हते तर बहुजन समाजाचे नेते होते. सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी, त्याच्यावर होणारा अन्याय दुर करण्यासाठी मुंडे साहेबांनी शिवनेरी ते शिवतिर्थ संघर्ष यात्रा काढली. शेतकर्यांना न्याय मिळवून देण्यासाठी गोदावरीची परिक्रमा केली. त्यांचा हा संघर्ष कुठल्या एका समाजासाठी नव्हे तर आठरा पगड जाती- धर्मातील गरीब माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी होता. जिथे अन्याय होईल तिथे मुंडे साहेब धावून जायचे, लोकांमध्ये मिसळायचे. यामुळेच लोकनेते म्हणून त्यांचा लोकांनी गौरव केला. स्वकर्तृत्वाने दिल्लीच्या तख्तापर्यंत गेलेल्या मुंडे साहेबांचे आज घराघरातील देव्हार्यात फोटो आहेत. गावा- गावात त्यांच्या नावाचे चौक असून बोरफडी हे गाव लोकनेते मुंडे साहेब यांच्या नेतृत्वावर प्रेम करणारे गाव आहे. गावातील सर्व जाती- धर्मातील लोकांनी एकत्र येऊन प्रमुख चौकाला मुंडे साहेबांचे नाव दिले. यावरूनच लोकांचे त्यांच्यावर किती प्रेम होते हे कळते, असे सर्जेराव तांदळे म्हणाले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरेश घुगे, नवनाथ घुगे, भाऊसाहेब घुगे, राहुल घुगे, बद्रीनाथ घुगे, गोरख घुगे, हरिभाऊ घुगे, दत्ता घुगे, संतोष घुगे यांनी परिश्रम घेतले.















