Uncategorized

वक्फ बोर्डाच्या राज्यातील दहा जागांची निवड करून ‘बीओटी’ तत्वावर प्रकल्प राबवणार,समीर काझी यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत धोरणत्मक निर्णय

प्रतिनिधी | बीड
महाराष्ट्र वक्फ बोर्डाचे सदस्य समीर काझी यांनी मुंबई ईथे वक्फ बोर्डाच्या मीटिंगमध्ये अध्यक्षपद भूषवत विविध धोरणात्मक निर्णय सहकारी सदस्यांच्या साथीने घेतले. यात प्रामुख्याने वक्फ बोर्डाच्या मालकीच्या महाराष्ट्रातील १० जागाची निवड करून बांधा, वापरा व हस्तांतरित करा या तत्वाद्वारे प्रकल्प राबवण्यासाठी धोरण ठरवण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीनंतर बोर्ड सदस्यांनी ज्येष्ठ नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांची भेट घेत ५०० कोटी रूपयांचे विशेष आर्थिक पॅकेज देण्याची मागणी केली.
  बीड येथील समीर काझी यांची नुकतीच महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाच्या सदस्यपदी निवड झालेली होती. या निवडीनंतर काझी यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे सोमवारी (ता.१८ ऑक्टोबर) बोर्डाची बैठक झाली. व्यासपीठावर खासदार इम्तियाज जलील, खासदार डॉ.फौजिया खान, डॉ.मुदस्सर लांबे, अॅड.ए.यु.पठाण, वजाहत मिर्झा, हसनैन शाकीर, मौलाना अतर अली, इम्तियाज काझी यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. बोर्डाला विविध जनकल्याणकारी योजना राबवियासाठी स्वत:चा असा उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण व्हावा, यासाठी बीओटी तत्वावर राज्यातील दहा जागांची निवड करण्यासाठी धोरणात्मक तरतूद करण्याचे निश्चित करण्यात आले. यासह बोर्डाची वसुली व बोर्डास धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी जिल्हानिहाय पालक संचालक पद निर्माण करण्याचा निर्णय घेऊन सर्व सर्व सदस्यांना जिल्हानिहाय पालक संचालकाची जवाबदारी देण्यात आली. त्यामध्ये समीर काझी यांच्याकडे बीड, लातुर, उस्मानाबाद आणि सोलापूर या ४ जिल्ह्याचे पालक संचालक म्हणून दायित्व देण्यात आले. यासोबतच  थकीत बाकी वसुलीसाठी  पथक निर्माण करणे, सन २०१४ च्या भाडेपट्टा करार नियमाप्रमाणे नूतनीकरणाच्या अंमलबजावणीस मान्यता देण्यात आली. यावेळी इतर सदस्यांनीही या बैठकीत सूचना केल्या. या सूचनांवर एकत्रिपणे चर्चा करण्यात आली. शिवाय धोरणात्मक निर्णय जलदगतीने राबविण्याचे निश्चित करण्यात आले.

लवकरच बैठक होणार
वक्फ बोर्डाच्या सदस्यांनी समीर काझी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची भेट घेतली. याप्रसंगी बोर्डाच्या विविध अडचणी मांडून ५०० कोटींच्या विशेष पॅकेजची मागणी करण्यात आली. या मागण्यांची दखल घेत पवार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, नगरविकास मंत्री, सामाजिक न्याय मंत्री, गृह मंत्री व अल्पसंख्याक मंत्री यांची वक्फ बोर्डासह एकत्रित बैठक घेण्याची ग्वाही दिली.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!