Uncategorized

मंत्री बँकेची आर्थिकस्थिती उत्तम – प्रशासक, सर्वसाधारण सभेत ठेवीदारांचा विश्‍वास वाढला


बीड, दि. 26 (लोकाशा न्यूज) : येथील व्दारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेची 59 वी वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेवर नवनियुक्त प्रशासक तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, बीड यांचे अध्यक्षतेखाली रविवारी बालाजी मंदिर सभागृहात शांततेत व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. सभेस प्रत्यक्ष 50 तर ऑनलाईनव्दारे 516 सभासद उपस्थित होते. प्रशासकांचे नियुक्तीमुळे बँकेचे सभासद, ठेवीदार, ग्राहकांनी अफवांवर विश्‍वास न ठेवता संयम ठेवावा, बँकेत कुठलाही अपहार, गैरव्यवहार झालेला नसून बँकेवर कर्ज व्यवहाराव्यतिरिक्त इतर बँकींग व्यवहारावर भारतीय रिझर्व बँकेने निर्बंध लादलेले नाहीत, प्रशासकीय अनियमितता दुर करण्याच्या दृष्टीने बँकेवर सदर कार्यवाही केलेली असल्याचे यावेळी प्रशासकांनी सांगून बँकेची आर्थिक स्थिती उत्तम असल्याचे नमूद केली.
पुढे बोलताना बँकेचे प्रशासक विश्‍वास देशमुख यांनी सांगितले, की बँकेची सध्याच्या ठेवी जवळपास 280.00 कोटी रूपये असून 200.00 कोटी रूपयांचे कर्ज वाटप बँकेने केलेले आहे. बँकेच्या ताळेबंदाप्रमाणे सध्या बँकेने रू. 108.00 कोटींची गुंतवणूक सरकारी रोखे व इतर बँकांमध्ये केलेली आहे. बँकेतील रोख व चालू खात्याची शिल्लक रक्कम 12.00 कोटी असे एकूण 120.00 कोटी बँकेकडे उपलब्ध आहेत. बँकेतील प्रशासकीय अनियमितता दुर करण्याच्या दृष्टीने भारतीय रिझर्व बँकेच्या निर्देशानुसार सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दि. 24 सप्टेंबर 2021 रोजीच्या आदेशान्वये माझी उक्त बँकेवर प्रशासक म्हणून नियुक्ती केलेली असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. बँकेच्या सभासदांनी बँकेच्या सुधारण्यासाठी ज्या सभासदांकडे बँकेची कर्जबाकी असेल त्यांनी सदर कर्जाचे प्रमाण कमी होणे गरजेचे असून बँकेच्या सर्व सभासदांनी बँकेच्या हिताच्या दृष्टीने अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असेही यावेळी त्यांनी सांगितले. याप्रसंगी तालुका उपनिबंधक सहकारी संस्था, बीड जी.के. परदेशी, बँकेचे सभासद उपस्थित होते. प्रारंभी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर.व्ही.सोनी यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित व ऑनलाईन जॉईन सर्व सभासदांना बँकेच्या सर्वसाधारण सभेतील विषयपत्रिकेतील समाविष्ट असलेल्या विषयांची विषयनिहाय सर्व माहिती देवून सर्वानुमते ठराव समंत करण्यात आले. उपरोक्त प्रमाणे कामकाज झाल्यानंतर सभेस प्रत्यक्ष व ऑनलाईन उपस्थित असलेल्या बँकेच्या सर्व सभासदांचे बँकेच्या प्रशासकांनी आभार व्यक्त करून चहापानानंतर बँकेच्या सर्वसाधारण सभेचे कामकाज संपल्याचे जाहीर केले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!