लातूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आडत बाजारात गेल्या काही महिन्यांपासून सोयाबीनच्या दरात कमालीची वाढ होत आहे. ७ हजार ते साडेसात हजार, असा दर काही महिने स्थिर होता. परंतू गेल्या काही दिवसांत सोयाबीनच्या दराने मोठी उसळी घेतली आहे. यात मंगळवार दि. २७ जुलै रोजी तर सोयाबीनचा दराने गगन भरारी घेतली आहे. आडत बाजारात कमाल दर ९ हजार ८५१ रुपये प्रती क्विंटलला राहिला तर सर्वसाधारण दर ९ हजार ७०० रुपये राहिला आहे.
महाराष्ट्रातील अग्रगण्य बाजार समित्यांमध्ये विशेष महत्व असलेली बाजार समिती म्हणून ओळख असलेल्यापैकी लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. या बाजार समितीमध्ये विक्रीसाठी येणा-या शेतीमालाची विक्रमी आवक असते. याच बाजार समितीत संपूर्ण जिल्ह्यासह मराठवाडा व आंध्र, कर्नाटकच्या सिमा भागातूनही मोठ्या प्रमाणात शेतीमालाची आवक होत असते. तूरीचा देश पातळीवरचा भाव लातूर बाजार समितीतून निघतो, ही बाब कौतुकास्पद आहे. त्यातच लातूर ही सोयाबीनची मोठी बाजारपेठ आहे. हंगाम सूरु असताना दररोज किमान ५० हजार क्विंटलची आवक येथील आडत बाजारात राहते. या वर्षीच्या हंगामाच्या सुरुवातीला सोयाबीनला ४ ते ४ हजार ५०० रुपये क्विंटलला दर मिळाला. त्यानंतर सोयाबीनच्या दरात सातत्याने वाढ होत गेली. काही महिने ७ हजार ते ७ हजार ५०० रुपये स्थिर दर राहिला. त्यानंतर त्यातही वाढ होत गेली.
मंगळवारी तर सोयाबीनच्या दराने उच्चांकी गाठली. येथील आडत बाजारात सोयाबीनला कमाल दर ९ हजार ८५१ रुपये प्रती क्विंटलला मिळाला आहे. किमान दर ८ हजार ९०० तर सर्वसाधारण दर ९ हजार ७्र०० रुपये प्रती क्विंटल राहिला. सध्या बाजारपेठेत पाच ते सहा हजार क्विंटल सोयाबीनची आवक आहे. गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात मोठी तेजी दिसून येत आहे. मंगळवारी सोयाबीनच्या प्रती क्विंटलला उच्चांकी दर मिळाला.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा परिणाम
सोयाबीनला आतापर्यंत एवढा दर कधीच मिळाला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोयाबीनच्या पेंडीला मागणी वाढली आहे.त्यात आवक मोठी नाही त्याचा परिणाम सोयाबीनचे दर वाढत चालले आहेत. येत्या दोन-तीन दिवसांत आणखी दरवाढ होईल, असे व्यापा-यांचे म्हणणे आहे.