आष्टी

आष्टीत परप्रांतीय कामगाराची मालकालाच टोपी,गल्ल्यातील साडेतीन लाख चोरले, चोरी सीसीटीव्हीत कैद

कडा / वार्ताहर
————— दुकानात कामावर ठेवलेल्या परप्रांतीय कामगाराने दुकान बंद केल्यानंतर रात्री येऊन दुकानात चोरी करुन गल्ल्यातील साडेतीन लाख चोरल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला असून या प्रकरणी आष्टी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, आष्टी येथील दुकानदार बाबू भाऊसाहेब पोकळे (रा. चिंचाळा ता. आष्टी) यांनी बुधवार दि.१४ रोजी आष्टी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आत्मज मैनुल्लाह अन्सारी (रा. पूर्व चंपारण, जि. दरियाकोट, बिहार) याच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाबू पोकळे यांचे आष्टी-नगर रस्त्यावर बालाजी स्टील आर्ट नावाचे स्लायडिंग व स्टीलचे दुकान आहे. दुकानामध्ये कामासाठी पाच ते सहा मजूर आहेत. त्यापैकी अन्सारी हा चार महिन्यांपूर्वी कामास होता. मंगळवारी १३ रोजी अन्सारी हा दिवसभर कामावर होता. स्लायडींग काचेच्या मालाची गाडी रात्री येणार असल्याने पोकळे यांनी आठ दिवसांपासून जमा करून ठेवलेली रक्कम तीन लाख पन्नास हजार रूपये काऊंटरच्या गल्ल्यात सकाळी अकरा वाजण्याचे सुमारास ठेवली होती. ते अन्सारीने पाहिले होते. रात्री दहा वाजता दुकान बंद करून पोकळे घरी जेवणासाठी गेले होते. दुकानातील कामगार आत्मज मैनुल्लाह अन्सारी व जावेद हे दोघे दुकानाच्या पाठीमागील रूममध्ये राहण्यासाठी मुक्कामी होते.
दरम्यान, घरी गेल्यानंतर काच आणणार्‍या वाहनचालकाने गाडी नादुरूस्त असल्याने सकाळपर्यंत येईल असे सांगितले. त्यामुळे ते पुन्हा दुकानात परत न जाता घरी चिंचाळा येथे गेले. दुसर्‍या दिवशी सकाळी दुकानात गेले असताना पोकळे यांना काउंटरचे लॉक तोडलेले व आत ठेवलेले साडेतीन लाख रुपये चोरीला गेल्याचे लक्षात आले. आजूबाजूला पाहणी केली असता दुकानाच्या मागील बाजूचे लाकडी प्लायवूड कापलेले दिसले. दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यामध्ये अन्सारीने दि.१३ रोजी रात्री पावणेअकराच्या सुमारास पाठीमागील लाकडी प्लायवूड कापून आतमध्ये प्रवेश करून चोरी केल्याचे आढळून आले. त्यावरून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!