मुंबई -शिवसेना-भाजपायांच्यातील संघर्ष आता रस्त्यावर पाहायला मिळत आहे. दादरच्याशिवसेनाभवनासमोरचभाजपाआणि सेनेचे कार्यकर्ते भिडले आहेत.राम मंदिराच्यामुद्द्यावरून शिवसेनेने भाजपाला लक्ष्य केल्यानंतर हा वाद सुरू झाला आहे. भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी थेट शिवसेना भवनावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. मात्र शिवसेना भवनाच्या काही अंतरावरच पोलिसांनी त्यांना अडवले.
राम मंदिरावरूनसुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपावरूनशिवसेना भवनासमोर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. शिवसैनिक आणि भाजपा कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर गेले. राम मंदिर जमीन खरेदी व्यवहारावरून झालेल्या आरोपावरून भाजपाने फटकार मोर्चा आयोजित केला होता. भाजपा युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. शिवसेना भवनाकडे निघालेल्या भाजपा कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवून त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन जात होते. तेव्हा शिवसेना भवनासमोर आमदार सदा सरवणकर यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. त्यांनी घोषणाबाजीला सुरूवात केली. शिवसैनिकांनी भाजपाच्या महिला पदाधिकार्याला मारहाण केल्याचा आरोप लावण्यात येत आहे.
भाजपाचा आरोप काय?
अयोध्येत श्री राम मंदिर बांधण्यासाठी भूसंपादनाबाबत खोटे आणि बनावट आरोप करून शिवसेनेने हिंदू धर्म, धार्मिक स्थळ आणि रामभक्तांच्या श्रद्धेचा अपमान केला आहे. शिवसेनेच्या या राजकीय षडयंत्राविरोधात भाजपा युवा मोर्चाने फटकार मोर्चाचं आयोजन केले होते. याच्या विरोधात निषेध करण्यासाठी शिवसेना भवनासमोर जमण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना करण्यात आलं होतं.
काय आहे शिवसेनेची भूमिका?
अयोध्येतील राममंदिर उभारणीचे काम आणि त्यामागचा व्यवहार पारदर्शक, प्रामाणिक पद्धतीने व्हावा. रामभक्तांच्या श्रद्धेस तडा जाईल असे काही घडू नये ही अपेक्षा असतानाच जमीन व्यवहाराचे संशयास्पद प्रकरण समोर आले. ते खरे की खोटे याचा लगेच खुलासा झाला तर बरे! राममंदिर कार्य हे राष्ट्रीय अस्मितेचे कार्य आहे. या कार्याची कोणी जाणीवपूर्वक बदनामी करत असेल तर त्यांच्यावरही कारवाई होणे गरजेचे आहे. अयोध्येतील राममंदिर हे रामभक्तांचा त्याग, संघर्ष व बलिदानातून उभे राहिले. हाच इतिहास आहे. एखाद्या घोटाळ्याचा डाग त्या मंदिरावर पडत असेल तर पंतप्रधान मोदी, सरसंघचालक भागवतांना त्यात हस्तक्षेप करावाच लागेल, असा सल्ला शिवसेनेने दिला होता.