बीड

कळसंबर शिवारातील बिबट्याचा ताबडतोब बंदोबस्त करा-राजेंद्र मस्के, वनविभागाचे दुर्लक्ष जनतेमध्ये भीतीचे सावट


बीड प्रतिनिधी
शुक्रवारी बीड तालुक्यातील कळसंबर येथील अजिनाथ बाबुराव वाघमारे या तरुण शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला करून जखमी केले आहे. वाघमारे यांच्या गालाला बिबट्याचा दात लागला असून सात टाके पडले आहेत तर हाताला चार टाके पडले. आरडओरडा करून कसातरी जीव वाचवण्यात यश मिळाले. या जखमी शेतकऱ्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार चालू आहेत. भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी रुग्णालयात जखमी शेतकऱ्याची भेट घेऊन प्रकृतीची चौकशी केली. उपचारासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले यावेळी त्यांच्या समवेत भगीरथदादा बियाणी, डॉ.लक्ष्मण जाधव,संभाजी सुर्वे,महेश सावंत,बद्रीनाथ जटाळ हे उपस्थित होते.
मागील वर्षी आष्टी,पाटोदा भागात बिबट्या आढळून आला होता. कोरोनाची दुसरी लाट ओसरण्याच्या आधी बीड तालुक्यात बिबट्याचे संकट समोर आले. शुक्रवारी सकाळी कळसंबर शिवारात बिबट्याचे दर्शन घडल्यानंतर ग्रामस्थांनी प्रशासनाला माहिती कळवली. बिबट्याच्या शोधासाठी एकजुटीने गावकरी कामाला लागले. वनविभागाचे अधिकारी कर्मचारी गावात येऊन गेले. तुम्ही बिनधास्त राहा आम्ही बिबट्याचा बंदोबस्त करतो एवढे सांगून निघून गेले. यानंतर दुपारी आजिनाथ वाघमारे यांच्यावर त्याने हल्ला केला. परंतु अद्याप पर्यंत वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस पाउल उचलले नाही. कळसंबर व परिसरातील जनतेमध्ये भीतीचे सावट कायम आहे. दुर्दैवाने या बिबट्याने एखादा नरबळी घेतला तर त्याला माणसाच्या रक्ताची चटक लागेल आणि नरभक्षक बिबट्याच्या धास्तीने शेतकऱ्यांचे जीव धोक्यात येतील. कोरोनाच्या आर्थिक संकटात होरपळलेल्या शेतकऱ्यांना बिबट्याचे हे नवीन संकटाचे तातडीने निवारण झाले पाहिजे.जिल्हा प्रशासन व वनविभागाने ताबडतोब उपाययोजना करून या बिबट्याला जेरबंद करून जनतेला भयमुक्त करावे अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!