देश विदेश

गावकऱ्यांनो आता एक फोनवर होणार कोरोना लस बुक; सरकारकडून ‘1075’ टोल फ्री नंबर जारी

नवी दिल्ली – देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या 2,75,55,457 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,86,364 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 3,660 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 3,18,895 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशात लसीकरण मोहीम सुरू असून लाखो लोकांनी लस घेतली आहे. याच दरम्यान कोरोना लसी संदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
नॅशनल हेल्थ अथॉरिटी (NHA) चे हेड आरएस शर्मा यांनी शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, देशभरात 1075 कॉल सेंटर सुरू करण्यात आले आहेत. जिथे फोन करून कोरोना लसीसाठी अपॉईंटमेंट बूक करता येणार आहे. ग्रामीण भागात तंत्रज्ञान आणि इंटरनेट नसल्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. नागरिक सर्व कॉमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून रेजिस्ट्रेशन करू शकतात आणि स्लॉटही बुक करू शकतात. त्यासाठी सरकारकडून ‘1075’ टोल फ्री नंबर जारी करण्यात आला आहे. कोरोना लसीकरण मोहिमेमध्ये ग्रामीण भागातील लोकांना बाजूला केले जात असल्याचा आरोप शर्मा यांनी फेटाळला आहे. जिल्हाधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचारी लसीकरणाबाबत मोठ्या प्रमाणात जागरुकता निर्माण करत आहेत. तसेच ग्रामीण भागातील लोकांना लसीकरण करण्यास मदत करत आहेत. आर.एस. शर्मा यांनी 45 वर्षांवरील नागरिक हे थेट केंद्रावर जाऊन नोंदणी करुन लस घेत आहेत असं म्हटलं आहे. लसीचा पुरवठा कमी असल्याने 18 ते 45 वयोगटातील लोकांना लसीकरणासाठी काही समस्यांचा सामना करावा लागत आहे. मात्र ही तात्पुरती समस्या आहे असं देखील त्यांनी म्हटलं आहे. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!