बीड शिरूर

कोरोनाने आईचे निधन झाल्यानंतर दिव्यांग कुटुंबाला गावाने टाकले वाळीत ; शिरूर कासार तालुक्यातील वारणी येथील घटना

बीड, दि.19 ( लोकाशा न्यूज) :- कोरोनामुळे महिलेचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण दिव्यंग कुटुंबाला वाळीत टाकल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. कोरोनाने खरच माणुसकी शिल्लक ठेवली का ?
बीड जिल्ह्यातील वारणी गावात राहणाऱ्या आणि संपूर्ण दिव्यांग असलेल्या धोत्रे कुटुंबाच्या आधार असलेल्या 55 वर्षीय आई सोनाबाई धोत्रे यांचे कोरोनाने निधन झाले. अंत्यविधी प्रशासनाने केला, मात्र अंत्यविधी करून गावात आल्यावर गावातील लोकांनी या कुटुंबाला अक्षरशः वाळीत टाकले. घरात दुःखद प्रसंग असताना शेजाऱ्या पाजाऱ्यांनी घराची दारे लावून घेतली. इतकेच नाही, तर त्यांना पाणी मिळू नये, यासाठी गावातील हातपंपाची चैन काही व्यक्तींनी काढून नेली. शेजाराच्या घरात पाण्याची बोअर आहे, पण त्याने पाणी देण्यास नकार दिला. यामुळे दोन दिवस हे कुटुंब पाण्याविना राहिले. दोन दिवस तशाच अवस्थेत राहिल्यानंतर अखेर त्यांनी सामाजिक कार्यकर्त्याला फोन लावला आणि पाण्याची सोय करुन घेतली. यावेळी, आम्हाला इतरांच्या मदतीशिवाय बाहेरुन पाणी आणता येत नाही, असे सांगताना धोत्रे कुटुंबियांच्या डोळ्यात पाणी तरळले.


याबाबत सविस्त माहिती अशी की, शिरूर कासार तालुक्यातील वारणी गावचे लक्ष्मण धोत्रे यांना चार मुले आणि एक मुलगी आहे. हे सर्वजण दिव्यांग आहेत. मुलांची लग्न झाली पण, त्यांच्या त्यादेखील दिव्यांग आहेत. घरात या कुटूंबाचे पालन पोषण करणाऱ्या 55 वर्षीय आई सोनाबाई धोत्रे 11 मे रोजी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने उपचारासाठी बीडला दाखल केले होते. पण, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. प्रशासनाने अंत्यसंस्कार केले, मात्र अंत्यसंस्कार करून आल्यावर गावातील लोकांनी या दिव्यांग कुटुंबाला अतिशय घृणास्पद वागणूक दिली.

दोन दिवस पाण्याविना काढले
हे दिव्यांग कुटुंब अंत्यविधीनंतर घराकडे आल्यावर कुणीच त्यांची साधी विचारपूसदेखील केली नाही. विचारपूस तर सोडा, त्यांना पाणी सुद्धा दिले नाही. गावातील सार्वजनिक शाळेच्या हातपंपाची साखळी कुणीतरी काढून नेल्यामुळे दोन दिवस पाण्याविना राहावे लागले. दोन दिवस सहन केल्यानंतर अखेर सामाजिक कार्यकर्ते माऊली शिरसाट यांना फोन करुन बोलावले आणि शेजाऱ्यासोबत भांडून त्यांच्या घरातील पाणी भरून दिले. या घटनेची माहिती मिळताच तहसील प्रशासनाने ग्रामपंचायतीला सांगून सार्वजनिक हातपंप दुरुस्त करून घेतला. पण, या कुटुंबाला जी वागणूक दिली, त्यावरुन माणुसकी जिवंत आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!