बीड

प्रत्येक कामांचा निधी गतीने खर्च करा – शिवकन्या सिरसाट, 2021-2022 च्या बजेटला जीबीत दिली मंजूरी, जयसिंह भैय्यांच्या बांधकामला आला सहा कोटींचा निधी


बीड, दि. 22 (लोकाशा न्यूज) : चालू वर्षातील प्राप्त निधी गतीने खर्च करावा, अशा सुचना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवकन्या सिरसाट यांनी अधिकार्‍यांना दिल्या आहेत. विशेष म्हणजे सभापती जयसिंह सोळंके यांच्या बांधकाम विभागाला शासनाकडून 2515 चे पाच कोटी 90 लाख रूपये प्राप्त झालेले आहेत. हाही निधी तात्काळ वितरीत करण्याचे आदेश सिरसाट यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत. सोमवारी येथील नियोजन विभागाच्या कार्यालयात जीबीची बैठक पार पडली. यावेळी सन 2021-2022 मधील 11 कोटी 39 च्या बजेटला मंजूरी देण्यात आली.
सोमवारी पार पडलेल्या जीबीच्या बैठकीला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवकन्या सिरसाट, उपाध्यक्ष बजरंग सोनवणे, समाज कल्याण सभापती कल्याण आबूज, कृषी व पशुसंवर्धन सभापती सविता मस्के, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. काळे, जि.प.सदस्य सविता गोल्हार, राजेसाहेब देशमुख, अशोक लोढा, भारत काळे, रेखाताई क्षीरसागर, आशा दौंड, योगिनी थोरात, अनिता मुंडे, अविनाश मोरे, खेडकर, शंकर उबाळे यांच्यासह आदींची उपस्थिती होती. या बैठकीत चालू वर्षातील कामांचा आढावा घेवून सन 2021-2022 या वर्षातील 11 कोटी 39 लाख रूपयांच्या बजेटला मान्यता देण्यात आली. निधी कोणत्याही कामाचा असो तो गतीने आणि वेळेत खर्च करावा, अशा स्पष्ट सुचना यावेळी अध्यक्षा शिवकन्या सिरसाट यांनी दिल्या आहेत. विशेष म्हणजे मार्च एण्ड आठवड्यावरच आला असल्यामुळे त्या जिल्हा परिषदेच्या अधिकार्‍यांबरोबरच कर्मचार्‍यांकडून गतीने काम करून घेत आहेत. याचा संपूर्ण जिल्ह्याच्या विकासासाठी फायदा होणार आहे. यावेळी त्यांनी डीपीसीच्या निधीवरही चर्चा केली, त्याचबरोबर सभापती जयसिंह सोळंके यांच्या बांधकाम विभागालाही शासनाकडून 2515 चे पाच कोटी 90 लाख रूपये प्राप्त झाले आहेत. हाही निधी तात्काळ वितरीत करण्याचे आदेश अध्यक्षा सिरसाट यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत. दरम्यान यावेळी उपस्थित सदस्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून चर्चा घडवून आणली.

असे आहे पुढील वर्षातील झेडपीचे बजेट
बांधकाम एक कोटी 43 लाख
शिक्षण एक कोटी 63 लाख
आरोग्य 38 लाख
पाणी पुरवठा व स्वच्छता 40 लाख
समाजकल्याण एक कोटी 37 लाख
महिला व बाल कल्याण 40 लाख
कृषी 57 लाख 73 हजार
पशुसंवर्धन 55 लाख 52 हजार
लघु पाटबंधारे 22 लाख
पंचायतराज कार्यक्रम – चार कोटी 80 लाख

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!