- आज पंतप्रधान मोदी यांनी ‘मन की बात’ (Mann Ki Baat) कार्यक्रमात बीड पोलिस दलातील श्वान रॉकीचा केला उल्लेख
- साडे तीनशे पेक्षाही जास्त गुन्ह्यांचा तपास लावणाऱ्या रॉकीला 15 ऑगस्ट रोजी बीड पोलिसांनी दिली होती सलामी
मुंबई : पंतप्रधान मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता ‘मन की बात’ रेडिओ कार्यक्रमाद्वारे संवाद साधत असतात. आज, 30 ऑगस्ट रोजी देखील ते ‘मन की बात’ (Mann Ki Baat) कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधला. या संवादात त्यांनी आज बीड पोलिस दलातील श्वान रॉकीचा उल्लेख केला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, काही दिवसांपूर्वी टीव्हीवर आपण एक भावनिक दृश्य पाहिलं असेल, ज्यात बीड पोलिस दलाने श्वान रॉकीला सन्मानाने अंतिम निरोप दिला होता. रॉकीने 300 हून अधिक केसेसमध्ये पोलिसांना मदत केली होती, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
यावेळी मोदी यांनी सोफी आणि विदा या श्वानांचही कौतुक केलं. ते म्हणाले की, हे दोन्ही भारतीय लष्कराचे श्वान आहेत. आणि त्यांना ‘चीफ ऑफ आर्मी स्टाफ कंमेंडेशन कार्डस’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. आपल्या देशाचे रक्षण करताना, आपले कर्तव्य अतिशय उत्कृष्टेने पार पाडले यासाठी त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे, असं पंतप्रधान म्हणाले. भारतीय जातीमध्ये मुधोल हाउंड आहे, हिमाचली हाउंड या चांगल्या जाती आहेत. यांच्या पालनपोषणाचा खर्चही तुलनेने कमी असतो. आता आपल्या सुरक्षा संस्थांनी या भारतीय वंशाच्या श्वानांना आपल्या सुरक्षा पथकामध्ये समाविष्ट करण्यास प्रारंभ केला आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
बीडच्या रॉकीचं 15 ऑगस्ट रोजी निधन
बीड आणि बीड बाहेरच्या जवळपास साडेतीनशे पेक्षाही जास्त गुन्ह्यांचा तपास लावणारा बीड पोलीस दलातील श्वान रॉकीला बीड पोलिसांनी सलामी दिली होती. मागच्या 8 वर्षापासून रॉकी बीड पोलिसांच्या मदतीसाठी काम करत होता, मात्र आजारपणामुळे त्याचं 15 ऑगस्ट रोजी निधन झालं. रॉकीने 2016साली कर्नाटकच्या मैसूरमध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये कांस्यपदक पटकावले होते. खून आणि दरोड्यासारख्या मोठ्या गुन्ह्याचा तपास रॉकीने लावला होता. त्याच्या निधनानंतर बीड शहरातील एसपी ऑफिसमध्ये पोलिसांनी रॉकीला मानवंदना वाहिली. अगदी कोरोणाच्या संकटकाळात सुद्धा सोशल डिस्टंसिंग कसे ठेवायचे याचे प्रशिक्षण रॉकीला देण्यात आले होते.