मुंबई, दि. २८ (लोकाशा न्यूज) : अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सुशांतच्या कुटुंबीयांनी अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर अनेक आरोप केले आहेत. त्यामुळे सीबीआय, ईडी अशा विविध स्तरांमधून रियाची चौकशी सुरु आहे. त्यातच अनेक जण तिला सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्रोलदेखील करत आहेत. त्यामुळेच या सगळ्याला कंटाळून ‘मला आत्महत्या करावीशी वाटते’, असं रियाने म्हटल्याचं वृत्तात नमूद करण्यात आलं आहे. सध्या सुशांत सिंह राजपूत मृत्यप्रकरणात आता नार्कोटिक्स हा नवीन मुद्दा समोर आला आहे. या प्रकरणीदेखील रियावर अनेक आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे या आरोपांविषयी तिला काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर बोलत असताना एक बंदूक आणा आणि मला मारून टाका असं ती म्हणाली आहे. “हो. आता हे इतकंच बाकी होतं. एक काम करा मला आणि माझ्या कुटुंबाला एका रांगेत उभं करा आणि गोळ्या झाडून आमची हत्या करा. नाही तर आम्हीच आत्महत्या करतो, आता मला खरंच असं वाटायला लागलंय. मी हे सगळे आरोप फेटाळून लावते. कोणताही आधार नसताना हे आरोप करण्यात आले आहेत”, असं रिया म्हणाली. पुढे ती म्हणते, “मला खरंच आत्महत्या करावीशी वाटते. फक्त मलाच नाही तर माझ्या कुटुंबीयांनीदेखील आत्महत्या करायला हवी असंच मला वाटायला लागलं आहे. असं रोज मरत-मरत जगण्यापेक्षा, ही रोजची बदनामी सहन करण्यापेक्षा आत्महत्या केलेली बरी. पण मग मी आत्महत्या केल्यानंतर त्याला जबाबदार कोण? आम्ही मध्यमवर्गीय लोकं आहोत आणि मध्यवर्गीय लोकांसाठी त्यांची इज्जत, आत्मसन्मानचं सगळं काही असतं. आज मी ड्रग डिलर आहे, कालपर्यंत मी एक खुनी होते आणि आता आणखी काही असेल. हे खरंच निरर्थक आणि अर्थहीन आहे. मी आतापर्यंत मुद्दाम काही बोलत नव्हते”. दरम्यान, सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अनेकांनी रियावर निशाणा साधला आहे. तसंच सुशांतच्या कुटुंबीयांनीदेखील रियावर अनेक आरोप केले आहेत. परंतु, रियाने पहिल्यांदाच या प्रकरणी तिचं मौन सोडल्याचं दिसून येत आहे.