नवी दिल्ली : मुलं 20-25 वर्षाची झाली की कुटुंबातले मोठे पण सांगतात, की आता आपल्या पायावर उभा राहा. आत्मनिर्भर हो. आपल्या देशाला पण आता स्वातंत्र्याला इतकी वर्षे झाल्यानंतर तसंच आत्मनिर्भर व्हायची गरज आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आम्ही कधीपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा माल फेकत राहणार, आणि त्यांच्याकडून तयार वस्तू पुन्हा विकत घेणार. हे कधीपर्यंत चालत राहणार, आपल्याला आत्मनिर्भर व्हावंच लागेल, असं देखील पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.लाल किल्ल्यावरुन पंतप्रधानांनी सातव्यांदा संबोधन केलं. लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदींच्या हस्ते ध्वजारोहण झालं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेत यंदा स्वातंत्र्यदिन सोहळा पार पडत आहे. यंदा शाळकरी विद्यार्थ्यांऐवजी 500 एनसीसी कॅडेट सहभागी झाले आहेत. यावेळी मोदी म्हणाले की, देशात कोरोनाच्या आधी एन 95- मास्क, व्हेंटिलेटर, पीपीई किट बनत नव्हते. पण आपल्या उद्यमशीलतेनं ते करुन दाखवलं. आज आपण या गोष्टी निर्यातही करु लागलोय, असं ते म्हणाले. मागच्या वर्षी भारतानं परकीय गुंतवणुकीचे ( एफडीआय) चे सारे विक्रम मोडीत काढले. मागच्या वर्षी एफडीआयमध्ये 18 टक्के वाढ झालीय, असं ते म्हणाले.
जगामध्ये भारताचे योगदान वाढणे काळाची गरज
मोदी यावेळी म्हणाले की, भारत सध्या केवळ आपल्या गरजेपुरतेच अन्नधान्य पिकवत नसून, ज्यांना गरज असेल त्यांना देखील अन्नाचा पुरवठा करू शकेल अशा स्थितीत आहे. कृषी क्षेत्रात भारताने आत्मनिर्भर उद्दिष्ट साध्य केले आहे. आपल्याला मूल्यवर्धनाची आणि आपल्या कृषी क्षेत्रात आणखी परिवर्तनाची गरज आहे. संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे ही भारताची धारणा नेहमीच कायम राहिली आहे. ज्यावेळी आपण आर्थिक वृद्धी आणि विकास यावर लक्ष केंद्रित करत आहोत, त्यावेळी आपल्या या प्रवासात मानवता केंद्रस्थानी असलीच पाहिजे. जगामध्ये भारताचे योगदान वाढणे ही काळाची गरज आहे, यासाठी भारत आत्मनिर्भर बनणे गरजेचे आहे.
आपण भारताचंच नाही तर जगातील अनेक देशांचं पोट भरु शकतो
यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, आज जगातील अनेक मोठ्या कंपन्या भारतात येत आहेत. आता आपल्याला ‘मेक इन इंडिया’सोबत ‘मेक फॉर वर्ल्ड’ या मंत्रासह पुढे जायचं आहे. एक काळ होता, ज्यावेळी आपली शेतीव्यवस्था अतिशय मागास होती, तेव्हा देशवासियांचं पोट कसं भरणार ही सर्वात मोठी चिंता होती. आज आपण केवळ भारताचंच नाही तर जगातील अनेक देशांचं पोट भरु शकतो, असं मोदी यावेळी म्हणाले.
स्वत:च्या पायावर उभे राहणे अपरिहार्य
कोरोना संकटात ‘आत्मनिर्भर भारत’ हा 130 कोटी भारतीयांसाठी मंत्र बनला आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ हे स्वप्न प्रत्यक्षात येणारच. देशातील तरुण, महिला शक्तीवर माझा पूर्ण विश्वास आहे, असं मोदी म्हणाले. भारतासाठी स्वत:च्या पायावर उभे राहणे अपरिहार्य असून आपण निश्चितच हे स्वप्न पूर्ण करु. मला आपल्या देशातील गुणवत्तेवर पूर्ण विश्वास आहे. आपल्या नागरिकांवर, युवकांवर आणि महिलांवर विश्वास आहे. भारताच्या दृष्टीकोनावर माझा विश्वास आहे, असं मोदी म्हणाले. मोदी यावेळी म्हणाले की, वेदांमध्ये वसुधैव कुटुंबम सांगितलंय, तसंच विनोबा भावे म्हणत होते जय जगत. भारतानं विश्व हेच आपलं घर ही संकल्पना कायम जोपासलीय, असं ते म्हणाले.
सर्व कोरोना वॉरिअर्सना नमन
ते म्हणाले की, जे लोक विस्तारवाच्या भूमिकेत मग्न होते, त्यांनी सर्व जगाला दोन महायुद्धांमध्ये होरपळून टाकलं. मात्र अशा कालखंडातही भारतानं स्वातंत्र्यांची लढाई चालू ठेवली. भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी म्हटलं की, सर्व कोरोना वॉरिअर्सना मी नमन करतो. अनेकांनी प्राणही गमावले. मला विश्वास आहे की आपण विजयी होणारच. कोरोनाच्या संकटात आपल्या जीवाची पर्वा न करता, डॉक्टर, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, अॅम्ब्युलंस कर्मचारी, सफाई कर्मचारी, पोलीस कर्मचाऱ्यांसह अनेक लोक 24 तास सातत्याने काम करत आहेत, असं ते म्हणाले.