Uncategorized

नवजात बालकांना पाजण्याच्या बहाण्याने ‘त्यांनी’ मारला दागिन्यांवर डल्ला, अंबाजोगाई पोलिसांनी पकडलेल्या महिला चोरांकडूनआश्चर्यजनक खुलासे, दागिने घालून प्रवास करणार्‍या महिलांवर विशेष लक्ष; टीमवर्क’ने साधायच्या चोरीचा डाव


अंबाजोगाई, दि. 7 (लोकाशा न्यूज) : येथील बस स्थानकात आणि अंबाजोगाईहून जाणार्‍या आणि येणार्‍या बसमधून महिलांचे दागिने चोरी होण्याचे प्रकार सातत्याने घडत होते. चोर्‍यांच्या घटना थांबत नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, अंबाजोगाईच्या अपर अधीक्षक यांनी विशेष पोलीस पथके तयार करून नियोजनबद्ध तपास केला आणि दागिनेचोर महिलांच्या टोळीचा पर्दाफाश झाला.  चोरीसाठी नवजात बालकांचा वापरासह चोरीच्या इतर अनेक सुरस पद्धती पोलिसांच्या तपासातून उघड झाल्या आहेत.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने महिलांना बस प्रवासात अर्ध्या तिकीटाची सवलत दिली. परिणामी, महिला प्रवाशांची संख्या प्रचंड वाढली. याचा फायदा चोरट्यांनी देखील उचलला. मागील काही दिवसात अंबाजोगाई बसस्थानकाशी संबंधित दागिने चोरीचे एकूण 9 गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी अंबाजोगाई शहर ठाण्यात सर्वात जास्त म्हणजे 6 गुन्हे, अंबाजोगाई ग्रामीणला एक आणि परळी संभाजीनगर ठाण्यात दोन गुन्हे दाखल होते. सततच्या चोर्‍यांमुळे महिलामध्ये दहशत निर्माण झाली होती. अपर अधीक्षक कविता नेरकर यांनी चोरीच्या वाढत्या घटना गांभीर्याने घेतल्या आणि तपासात स्वतः लक्ष घातले.  नेरकर यांनी सर्व 9 गुन्ह्यातील फिर्यादींना बोलावून घेत त्यांच्याशी स्वतः चर्चा केली. बहुतांशी प्रकरणात चोरट्यांनी ज्येष्ठ महिलांना लक्ष केले होते. चोरीचे प्रकार ठराविक मार्गावर आणि ठराविक वेळेत घडत असल्याचे चर्चेतून त्यांच्या निदर्शनास आले. तसेच सर्व गुन्ह्यात महिला चोर सहभागी असल्याचेही लक्षात आले. त्यामुळे त्यांनी अंबाजोगाई शहर, ग्रामीण आणि संभाजीनगर पोलिसांचे विशेष पथक तपासासाठी तयार करून त्यांना सूचना केला. त्यानुसार पोलिसांनी अंबाजोगाईहून परळी, अहमदपूर, लातूर आणि बीडकडे जाणार्‍या बसेसवर पाळत ठेवली. तसेच अंबाजोगाई बस स्थानकात संशयास्पद वाटणार्‍या महिलांवरही लक्ष ठेवण्यात आले. सीसीटीव्हीचाही वापर करण्यात आला. त्यातून अंबाजोगाई बस स्थानकात मीराबाई काळे आणि पूजा भोसले (रा. सोनपेठ, परभणी) या दोन संशयित महिला पोलिसांना आढळून आल्या. पोलिसांनी त्यांना तातडीने ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून तब्बल 3 लाख 91 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. या महिलांकडून आणखी अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून त्यांच्यासोबत टोळीत अन्यत कितीजण सामील आहेत याचा पोलीस कसून तपास करत आहेत.  पोलीस चौकशीत या महिलांनी चोरीच्या पद्धतीबाबत अनेक आश्चर्यजनक खुलासे केले. सहसा 3 ते 4 महिलांची टोळी चोरीत सामील असते. बस स्थानकात सीसीटीव्ही असल्याने या महिला रस्त्यात बसला हात दाखवून मध्ये चढतात. बसमधील जास्त दागिने घातलेली अथवा स्वतःजवळील बॅगची अधिक काळजी घेणारी प्रवाशी महिला हेरली जाते. त्यानंतर त्या सावज महिलेला चिटकून, तिच्या पायाजवळ खेटून बसतात. स्वतःसोबत असलेल्या नवजात बालकाला पाजण्याच्या बहाण्याने हेरलेल्या बॅगवर पदर अथवा मोठा कपडा टाकला जातो. प्रवाशी महिलेला डुलकी लागली, किंवा लक्ष नसले की संधी साधून बॅगमधील मुद्देमाल लंपास करण्यात येतो. चोरी फत्ते झाली कि या महिला लगोलग येणार्‍या थांब्यावर उतरतात. चोरीच्या दुसर्‍या पद्धतीत या महिला जास्त गर्दी असणारी बस हेरतात. त्यानंतर गर्दीत बसमध्ये चढणार्‍या सावज महिलेच्या आजूबाजूला कोंडाळे करून धक्के देत तिच्या गळ्यातील दागिने अथवा बॅग लंपास केली जाते. दाखल सर्व 9 गुन्ह्यात चोरीच्या याच पद्धती अवलंबविण्यात आल्या होत्या.

सोन्याचे दागिने घालून प्रवास करणे टाळा
प्रवाशी महिलांनी फार गरज नसेल तर सोन्याचे दागिने घालून बसमधून प्रवास करणे टाळावे. अंगावर जास्त सोने घालूच नका. घरात सोने ठेवण्यापेक्षा शक्यतो लॉकरमध्ये ठेवा. प्रवासात सोबत सोने असले तरी त्याबाबत वाच्यता करू नका, कॉलवर त्याबाबत कोणाशी बोलू नका. आपली बॅग सुरक्षित ठिकाणी, कोणाचा हात लागणार नाही अशा ठिकाणी ठेवा. ज्येष्ठ महिलांनी एकट्याने प्रवास करणे टाळावे.
– कविता नेरकर, अपर अधीक्षक

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!