बीड, दि. 7 (लोकाशा न्यूज) : जलजीवनचे काम अडविल्याप्रकरणी चाटगावच्या (ता.धारूर) सरपंच, त्यांचे पती आणि काम अडविणार्या ग्रामस्थांवर तात्काळ गुन्हा दाखल करावा, असे आदेश सीईओ अजित पवार यांनी मंगळवारी द्रिंदुड पोलिसांना दिले आहेत. त्यानुसार आता याप्रकरणी लवकरच गुन्हा दाखल होणार आहे.
जलजीवन मिशन अंतर्गत देवदहिफळ (ता.धारूर) येथे पाणी पुरवठ्याचे कामकाज सुरू आहे. येथील कामकाज चाटगाववरही अंवलंबून आहे. त्यानुसार 30 मार्च 2023 व 30 मे 2023 रोजी चाटगावच्या सरपंच, त्यांचे पती आणि ग्रामस्थांनी कामाच्या ठिकाणी जावून काम बंद करण्याची धमकी दिली आणि सुरू असलेले कामही बंद केले. कार्यारंभ आदेशातील अटी व शर्ती मधील नियम क्र. 21 मध्ये नमुद केल्याप्रमाणे शासकिय काम करताना आडथळा निर्माण केल्यास तेथे पोलिस संरक्षण देण्यात यावे, असा नियम आहे. वास्तविक पाहता देवदहिफळ येथील काम शासन नियमाप्रमाणे 2024 पर्यंत पुर्ण करणे हे ठेकेदाराला बंधनकारक आहे. तरी आपण चाटगावच्या सरपंच, त्यांचे पती आणि काम अडविणार्या ग्रामस्थांवर भारतीय दंड संहितामधील तरतूदीनुसार योग्य ती कार्यवाही करावी व संबंधितांवर गुन्हा नोंद करून सदरचे काम पुर्ववत सुरू राहिल याबाबत सहकार्य करावे, असे सीईओ अजित पवार यांनी द्रिंद्रुड पोलिसांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
—